कोल्हापूर : ‘आप’ ने केले टक्केवारीच्या रावणाचे महानगर पालिकेसमोर दहन

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहुर्तावर दुष्ट दुर्जनांच्या निःपाता बरोबरच महानगरपालिकेच्या सार्वजनिक विकासकामात चालत असणार्या टक्केवारीचे पितळ उघडे पाडणाऱ्या टक्केवारीच्या रावणाचे आम आदमी पार्टीच्या वतीने दहन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून महापालिका कॉन्ट्रॅक्टर या व्हाट्सअप्प ग्रुपवरुन एक संदेश सगळीकडे व्हायरल झाला होता. या संदशामध्ये ’काम देताना जे ठरलंय ते करायचं, जास्त लांबड लावायची नाही’ असा एकप्रकारे इशाराच ठेकेदारांना दिला गेला.
दसऱ्याच्या पूर्व संध्येला महापालिकेसमोर जमून ‘आप’ कार्यकर्त्यांनी टक्केवारीच्या प्रतिकात्मक रावणाचे दहन केले. ‘टक्केवारीच्या रावणाचे दहन झालेच पाहिजे’, ’टक्केवारी थांबवा, महापालिका वाचवा’, ’ढपला संस्कृती बंद झालीच पाहिजे’, ’टक्केवारीत सामील असलेल्या कारभार्यांचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.
शहरातील खराब रस्ते, रखडलेली थेट पाईपलाईन, संथ अमृत योजना, ढपला संस्कृती, घरफाळा घोटाळा, संथ नगरोत्थान योजना, घाणेरड्या मुताऱ्या, पदांची खांडोळी
गायब पार्किंग अशा पद्धतीने रावणाचे दहा तोंड करण्यात आले होते.
टक्केवारी विरोधात ‘मिस्ड कॉल’ मोहिम सुरू करून शहरभर त्याची जागृती करण्यात येत आहे. 2009 साली सुरू झालेली नगरोत्थान योजना, अमृत योजना, थेट पाईपलाईन योजना अशा अनेक योजना टक्केवारीमुळे अर्धवट राहिल्याने या ‘टक्केवारी’ रुपी दुष्ट रावणाला संपवण्यासाठी ‘आप’ची लढाई सुरू राहील असे ‘आप’ चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, मयूर भोसले, विशाल वठारे, राज कोरगावकर, रविराज पाटील, शुभंकर व्हटकर, बसवराज हादीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, गिरीश पाटील, किशोर खाडे, सुधाकर शिंदे, विजय भोसले आदी उपस्थित होते.