कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या पुलांचे भरावक्षेत्र कमी करून तातडीने कमानी बांधकाम करा : खा. राजु शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
यावर्षी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलले असल्याचे जाणवून आले आहे.यामुळे शासनाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या पुलांचे भरावक्षेत्र कमी करून कमानी बांधकाम करावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेकडे खा. राजु शेट्टी यांनी निवेदनद्वारे केली.
कृष्णा, पंचगंगा, वारणा, दुधगंगा या नदयावर व त्यांच्या उपनद्यावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नदया पाञापासून दोन – दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधा-याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. सांगली व कोल्हापूर जिल्हयात मिळून कर्नाटक राज्यातील हिप्परगी या बंधा-यापर्यंत १०९ लहान मोठे पूल आहेत. त्यातील १०३ पूल हे महाराष्ट्राचे आहेत त्या सर्व पूलावर किमान दोन्ही बाजूस पुलाच्या भराव्यामध्ये किमान दोन- दोन कमानी पूल बांधणे गरजेचे आहे. जेणेकरून पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुलांचा भराव , अरूंद कमानी या बाबींचा विचार करून तातडीने या पुलांच्या दोन्ही बाजूस किमान दोन -दोन कमानी वाढवून भराव कमी करणेसंदर्भात योग्य ती कार्यवाही करून पुढील महापुराआधी या कामास प्राधान्य देऊन विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून मंजूरी देण्याची मा. खा. राजु शेट्टी यांनी मागणी केली.