रुग्ण वाढल्यास पुन्हा कठोर निर्णय घेणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

मुंबई :
संख्या अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची प्रत्येक जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा लॉकडाउन होण्याचे संकेत येथे पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात रुग्णालयातील बेडचीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न असेल. साताऱ्यासाठी ज्या बाबी लागतील, त्या देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार आज साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाची पाहणी आणि उद्घाटन केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची संख्या वाढू लागल्याने तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केले आहे. कोरोना रुग्णांची (patients) संख्या अशीच वाढू लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथे लॉकडाउन करण्यात आले आहे. तसेच आपण ज्यावेळी जेवताना किंवा चहापान करताना मास्क काढतो. त्यावेळी आपण एकमेकांसमोर येतो. त्या वेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो.