इचलकरंजी : सात हजारांची लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

इचलकरंजी प्रतिनिधी :
जमिनीच्या सातबारावर असलेला बँकेचा कर्जाचा बोजा कमी करुन नवीन सातबारा देण्यासाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने आलास व बुबनाळ गावचा तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. संशयित तलाठी गजानन आप्पासो माळी (वय ४६, रा. शिवाजी नगर, इचलकरंजी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महसुल क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, तक्रारदाराने आपल्या जमिनीवर कर्ज घेतले होते. ते फेडल्यानंतर जमिनीच्या सातबारावर बँकेचा कर्जाचा बोजा असल्याने तो कमी करण्यासाठी त्यांनी तलाठी गजानन माळी यांची भेट घेवून अर्ज दिला. यावेळी माळी यांनी बोजा कमी करायचा असेल तर सात हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. संबधीत तक्रारदाराने याप्रकरणी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांची भेट घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, कृष्णात पाटील, यांनी सापळा रचून माळी यांनी लाच मागितलेचे पुरावे निदर्शनास आनले. त्यानुसार तलाठी माही यांचेवर गुन्हा दाखल करुन अटक केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
इचलकरंजीमध्ये लाच मागणीचे प्रमाण वाढले आहे. दोनचं दिवसापूर्वी इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता आणि पंटरला लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली आहे.