बहिरेवाडी ग्रामस्थांचे पांग फेडण्याचे भाग्य मला मिळाले : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता; गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाच कोटीच्या योजनेचा पायाखुदाई.

बहिरेवाडी :
बहिरेवाडी ता. आजरा या गावाला पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष. पिण्याच्या पाण्यासाठी येथील माता-भगिनीची चाललेली वणवण मला अस्वस्थ करायची. या गावानेही माझी नेहमीच हिमालयासारखी पाठराखण केली आहे. या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी महत्वकांशी योजना मंजूर करून ग्रामस्थांच्या ऋणाचे पांग फेडण्याचे भाग्य मला मिळाले, अशी कृतज्ञता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
बहिरेवाडी ता. आजरा या गावाला मंजूर झालेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचा पायाखुदाई समारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. जलजीवन अंतर्गत हिरण्यकेशी नदीतून उपसा करून गावाला पाणी पुरवठा करायच्या या योजनेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, भौगोलिक रचना व डोंगर माथ्यावर वसल्यामुळे हे गाव पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी वंचितच राहिले. जमिनीतील पाणी साठ्यामुळे बोरवेलनाही पाणी लागायचे नाही. त्यावर इलाज म्हणून हिरण्यकेशीच्या पाण्याचा पर्याय शोधला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. आता शेतीच्या पाण्यासाठी आंबेहोळ प्रकल्पातून पाणी आणण्याची गरज आहे. या प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून या गावासाठी उपसा जलसिंचन योजना तयार करु, असेही ते म्हणाले.
माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, कागल तालुक्याच्या बरोबरीनेच मंत्री मुश्रीफ यांनी उत्तुर विभागातील गावांनाही समान न्याय दिला आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे बहिरेवाडी ग्रामस्थांचे पाण्यावाचून होणारे जन्मोजन्मीचे हाल थांबणार आहेत.
कल्पवृक्षाची सावली……
भाषणात माजी उपसरपंच सुरेश खोत म्हणाले, या गावाला पिण्याचे पाणी मिळेल अशी कधीकाळी आम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती. परंतु ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या ध्यासामुळे हे दिवास्वप्न साकार होत आहे. आम्ही जनता मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्या रूपाने कल्पवृक्षाच्या सावलीत विसावा घेत असल्याची आज आमची भावना आहे, असेही ते म्हणाले.
व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, महादेव पाटील, विजय वांगणेकर, उदय पोवार, गोविंद सावंत आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत जम्बोअण्णा गोरूले यांनी केले. प्रास्ताविक सरपंच अनिल चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले.