मंत्री मुश्रीफ यांनी त्यांच्या महिला संस्थेच्या माध्यमातून किती महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्याचा आकडा जाहीर करावा : राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पेन्शनसाठी दारात किती महिलांना उन्हात उभे केले, यापेक्षा त्यांनी,स्थापन केलेल्या माऊली महिला संस्थेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात किती महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्याचा आकडा जाहीर करावा. असे आव्हान शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. कागल येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राजे बँक व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या सौजन्याने मेक इन कोल्हापूर उपक्रमांतर्गत अंजना ठेंगे यांनी नव्याने सुरू केलेल्या सुगरण चहाचा शुभारंभ शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते झाले.
मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढविताना श्री. घाटगे पुढे म्हणाले, कागलमध्ये महिलांना साड्या-भेटवस्तू वाटून महिला सबलीकरण केल्याचे ते सांगतात. महिलांचा फक्त राजकारणापुरता वापर करतात. निवडणुकीपुरते महिलांचा कळवळा असल्याचा आव आणतात . नंतर त्यांची महिला संस्था गायब होते. मात्र या पारंपरिक राजकारणाला फाटा देऊन राजमाता जिजाऊ महिला समितीने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यवसायासाठी राजे बँकेमार्फत कर्जपुरवठा , प्रशिक्षण ,विक्रीसाठी व्यासपीठ उपल्बध करून दिले आहे. हाच त्यांच्यातील व आमच्यातील फरक आहे.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांनी पुढे यावे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आमची कामाची पद्धत आणि कासवाच्या गतीची असली तरी महिला सक्षमीकरणात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेविका विजया निंबाळकर,स्नेहल ठेंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी. पाटील, संचालक राजेंद्र जाधव,शाहूचे संचालक सतीश पाटील,रेवती बारकाळे,धनंजय पाटील आदी उपस्थित होते. स्वागत सौ.सुधा कदम यांनी केले. शीतल घाटगे यांनी आभार मानले.