ग्राहकाशी आणि व्यवसायाशी इमानदारी राखणारा प्रामाणिक अवलिया : बळवंत परीट

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
कोणताही धंदा अगर व्यवसाय टिकून राहतो तो त्याच्या प्रामाणिक आणि नियमित सेवेने. ते गेले तीस वर्षे कुडूत्री पंचक्रोशीची अगदी धोबी-परीट व्यवसायातून न चुकता सेवा देत आहेत.या सेवेतून त्यांनी ढिगभर माणसे कमावलीच आणि माणुसकीचाओलावा देखील.कपड्यांची देवाणघेवाण करत असताना कपड्यामध्ये त्यांना अनेक जणांचे सोने – नाणे सापडले पण त्यांनी त्याचा कधी मोह ठेवला नाही उलट ज्यांचे आहे त्यांच्यापर्यंत परत केले.आपल्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत व्यवसायाशी आणि ग्राहकाशी इमानदार पणा दाखवणारा असा प्रामाणिक अवलिया म्हणजे आवळी बुद्रुक (ता.राधानगरी)येथील बळवंत परीट होय.
वडिलार्जित व्यवसाय करताना सुरवातीला फार मोठ्या हालअपेष्टा सहन करत संसाराचा गाडा चालवावा लागला.नुसत्या गावातील लोकांच्यावर हा व्यवसाय चालणार नाही तर आणखीन ही गावांची भर या व्यवसायात टाकली पाहिजे म्हणून त्यांनी गुडाळ,गुडाळवाडी, करंजफेण, कुडूत्री आदी गावांत आपला फिरता व्यवसाय सुरू केला.मिळेल त्या ग्राहकाला न चुकता सेवा देत त्यांनी समाजात आपली प्रतिमा चांगली बनवली व विश्वास ही संपन्न केला.
आज कुडूत्री परिसराला ते जवळ जवळ ३० वर्षे सेवा देऊन नियमित सेवेला वाहून घेतले आहे.त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण आणाजे येथे घेतले पण परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही.पण जीवनात हार न मानता धोबी – परीट या आपल्या पारंपारिक व्यवसायाकडे लक्ष दिले.सुरवातीच्या काळात अगदी कमी पैशात जास्त कष्ट उचलले असले तरी त्यांची नाराजी नाही.उलट त्यांना लोकसेवा केलेला खुप समाधान आणि आनंद मिळाला. आज त्यांची पत्नी,मुलगा,त्यांच्या खांद्याला खांदा लावून धोबी-परीट या व्यवसायात साथ देत आहेत.दोन वर्षांपूर्वी त्यांना हृदय विकाराचा झटका आला तरी त्यांनी आपली लोकसेवा सोडली नाही.उलट या व्यवसातून फिरता व्यायाम होतो अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि मोठया उत्साहाने सेवा सुरू ठेवत गावा गावात आजही प्रामाणिक सेवा देत आहे.
एकंदरीत कपडे घेणे धुणे आणि कडक इस्त्री करून ते कार्यक्रम सण, उत्सव या आधी पोहच करणे हा त्यांचा दिनक्रम. यातून जे या तरुणाला बळ आणि समाधान मिळते
आहे ते वेगळेच आहे.मिळवलेले प्रेम आणि समाधान हे त्यांच्यासाठी लाखमोलाचे असून पुन्हा आपल्या व्यवसायात घट्ट धरून राहण्याचे बळ मिळते आहे ते निश्चितच प्रेरणा आणि नवी उभारी देणारे आहे.
पूर्वीच्या काळात महागाई नव्हती पण सध्या महागाई खूप आहे. एका व्यक्तीच्या ड्रेस साठी पूर्वी दहा रुपये घेतले जायचे.पण सध्याचा दर डब्बल झाला आहे.जरी हा दर डब्बल असला तरी आजच्या महागाईच्या काळात मिळालेले आर्थिक उत्पन्न न पुरण्याजोगे आहे.अशी खंत त्यांनी दैनिक महाभारत प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना व्यक्त केली
बळवंत परीट
आवळी बु!!