बिद्री साखर कारखान्याच्या गेटवर विरोधकांनी सभा घेत केला सत्ताधाऱ्यांचा निषेध

बिद्री प्रतिनिधी :
बिद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराला विरोध करण्यासाठी जिल्हा बॅकेचे संचालक अर्जुन आबिटकर, बाबा नांदेकर व अशोक फराकटे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना गेटवर निदर्शने करत सभा घेत सताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.
बिद्रीच्या मुख्य चौकातून विरोधी गटाच्या सभासदांनी एकत्रितपणे येत कारखान्याच्या मुख्य गेट वर निषेध सभेला सुरवात केली. यावेळी बिद्रीने शेअर्सचे घेतलेले पाच हजार रुपये सभासदांना परत करावेत , ऊस तोड वाहतूक नियमानुसार झाली पाहिजे ,उसाला प्रतीटन एफआरपीपेक्षा ५०० रुपये जादा दर मिळावा अशा विविध घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला .
निषेध सभेत बोलताना अर्जुन अबिटकर म्हणाले, के. पी .पाटील कारखान्यामध्ये एकाधिकारशाहीने कारभार करत आहेत. कारभार लै भारी म्हणता तर गोडावूनमध्ये सभा का घेतली ? तुमचा कारभार चांगला असेल तर सभा खुल्या माळावर घ्यायला काय हरकत होती ? अध्यक्षांनी लै भारीचे नुसत तुणतुण वाजवण्यापेक्षा सहविज प्रकल्पाच्या नफ्यातील पाच हजार रुपये शेअर्स ला वर्ग करावेत. नाहीतर यापुढे बिद्री बचाव समितीतर्फे तीव्र लढा उभारला जाईल .
यावेळी अशोक फराकटे , बाबा नांदेकर , बालाजी फराकटे, अरुणराव जाधव, नंदकुमार पाटील, शहाजी गायकवाड , विजय बलुगडे कल्याणराव निकम,अशोक वारके, सुभाष पाटील, मदन देसाई , विश्वनाथ पाटील, सुमित चौगले, राजू वाडकर, नंदकुमार पाटील,अक्षय पाटील ,सचिन वारके,भिकाजी पाटील, अरविंद पाटील यांच्यासह ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.
बिद्री चा कारभार बोगस गिरीत लै भारी !
या निषेध सभेवेळी बोलताना बाबा नांदेकर म्हणाले, शासनाच्या परिपत्रकाचा गैरफायदा घेत बिद्रीने शेअर्स रक्कम १५ हजार रुपये केली आहे. परंतु राज्यात आणि देशात स्वतःला लै भारी म्हणणार्या अध्यक्षांचा संपूर्ण कारभारच बोगस आहे. एवढच काय तर नफा तोटा पत्रक वाढवलेला त्यांचा अहवालही बोगसच असून बिद्री देशात बोगसगिरीत लै भारी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.