कोल्हापूर : दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा युवकांना करवीर पोलीसांकडून अटक

कोल्हापूर प्रतिनिधी :
चैनीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा युवकांना करवीर पोलीसांनी जेरबंद केली आहे. हर्षवर्धन शरद सुतार (वय २०) आणि विशाल सुभाष फाळके (वय २२ दोघे रा. रजपूतवाडी करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नांवे आहेत अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी सांगितले, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने संशयितांचा शोध घेण्यात येत होता. त्यासाठी गुन्हे शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल सुजय दावणे, पोलीस नाईक विजय तळसकर, बालाजी हांगे, योगेश शिंदे, अमोल चव्हाण यांनी वडणगे फाटा येथे नाकाबंदी केली होती.
त्यावेळी पन्हाळ्याकडून नंबर प्लेट नसलेली एक दुचाकी येताना दिसली. यामुळे थाबण्यास सांगितले, पण न थांबता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करुन त्यांना पकडले. दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे देण्यास ते असमर्थ ठरले. यामुळे त्यांच्याकडे सखोल केली असता त्यांनी हर्षवर्धन सुतार आणि विशाल फाळके आपली नावे असून तीन महिन्यापूर्वी केर्ली येथून चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अधिक तपास केला असता एक पिठाची गिरण आणि सहा दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी त्यांना अटक करुन चोरलेली गिरण आणि सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, श्रीधर जाधव, बळीराम पोतरे, विजय भिवटे, प्रकाश कांबळे, दत्ता बांगर, चालक धनाजी बरगे, सुनिल देसाई, रणजित लाधी यांनी ही कारवाई केली.