धक्कादायक : विषप्राशन करुन नवविवाहीत पती-पत्नीची आत्महत्या

विषप्राशन करुन नवदाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावी मध्ये घडली. राज संजय जाधव (वय 23) आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव (वय 20) या नवदाम्पत्याने विषप्राशन केले. दरम्यान, मृत्यूचे कारण अजूनही समोर आले नाही.
याबाबत माहिती अशी की, मृत राज आणि ऋतुजा यांचा विवाह अकरा महिन्यांपूर्वी झाला होता. राज जाधव हे बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय आणि द्राक्षबाग शेती करत होते. राज यांचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झाले असून ते नोकरीच्या शोधात होते. सध्या ते स्वतःची शेती करत होते तर त्यांच्या पत्नी गृहिणी म्हणूनच काम करत होत्या. ऋतुजा, राज यांचे आई-वडील आणि लहान भाऊ असे एकत्रितपणे राहत होते.
जाधव कुटुंबियांनी बुधवारी रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर राज आणि ऋतुजा हे दाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले आणि इतर कुटुंबीय दुसऱ्या खोलीत झोपी गेले. रात्री दीडच्या सुमारास राज यांच्या बेडरुममधून उलट्या होत असलेला आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू आला. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरूम कडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना राज आणि ऋतुजा हे विषारी औषध प्राशन करुन बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले.
कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी वाहनातून तासगांवातील डॉ. जाधव हॉस्पिटल इथे उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तासगांव ग्रामीण रुग्णालय इथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तातडीने या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी ते दोघे मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत.