जागतिक पर्यटन दिन व सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा होणार : पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जागतिक पर्यटन दिन व सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
जागतिक पर्यटन दिन व सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह पर्यटन व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन स्थळांचा वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती सर्वदूर पोहचावी. पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी यापुढे प्राधान्याने काम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन वृध्दीसाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांबरोबरच लोकसहभाग घेऊन काम केले जाणार आहे. पर्यटन दिन व सप्ताहामध्ये राबविण्यात येणारे उपक्रम चांगले दर्जेदार असावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.