कागल तालुक्यातील सोनाळी येथे ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले : ग्रामस्थात चर्चा

निकाल न्यूज प्रतिनिधी :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट रोजी शासनाने राबविण्याचा निर्णय घेत परिपत्रक जारी केले होते. ग्रामपंचायत स्तरावर याचे पूर्व नियोजन करून गावामध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात व्हावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर योग्य नियोजन होणे अपेक्षित होते. मात्र ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन, मनमानी कारभारामुळे अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या सोनाळी ( ता.कागल ) येथील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत सहा ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यक्रमासाठी न जाणे पसंद केले. याची चर्चा गावामध्ये रंगली होती.
ग्रामपंचायत कारभार सर्व समावेशक व जनतेला सहभागी करून घेणे अपेक्षित असताना मनमानी करण्यात येत असून महिला सदस्यांना व इतर काही सदस्यांना विचारात घेवून निर्णय घेण्यात येत नाहीत. हे गावच्या हिताच्या दृष्टीने दुर्दैवी आहे असे असेल तर ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते असे अनुपस्थित सदस्यांनी सांगितले.
सदस्या रेखा खोळाबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे म्हंटले आहे,प्रत्येक वेळी मासिक मीटिंगला जमा खर्चाची माहिती मागितली असताना देखील देण्यात आली नाही. महिला मिटिंग वेळेवर नाही, महिला सदस्यांना कधी इतर निधीची व झालेल्या जमा खर्चाची माहिती दिली जात नाही. त्यामुळे झालेल्या जमा खर्चावबाबत व पारदर्शक कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने झालेल्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणीही महिला सदस्यांनी केली आहे.