पूर नियंत्रणात सरकार अपयशी; हेक्टरी एक लाख भरपाई द्या : ‘आप’ प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसात सरासरी 800 मिलिमीटर पाऊस झाला. भूस्खलन, पाण्यात बुडालेली पिके, घरे व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. अतिवृष्टी थांबवता येत नाही, पण पूर नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. नाल्यांवर झालेली बांधकामे, अनधिकृत भराव, ब्ल्यू टू रेड झोनमध्ये झालेल्या बांधकामांमध्ये पायदळी तुडवल्याने पुराचे पाणी वाढले. आपत्ती व्यवस्थापनात कितीही काम केले तरी पूर नियंत्रणात सरकार अपयशी ठरले असे मत ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. ब्ल्यू टू रेड लाईनमध्ये बांधकामांनी तळ मजल्यावर केलेल्या अडथळ्यांना काढले नाही तर पुराचे पाणी वाढतच जाईल, या झोनमधील बांधकामांसाठी नवीन नियम बनवावेत असा ‘आप’चा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य समितीच्या दौऱ्यानिमित कोल्हापुरात आलेल्या राचुरे यांनी शहरातील जयंती व गोमती नदीवरील पूररेषा स्पष्ट करून नव्या उपयोजना कराव्यात अशी मागणी ‘आप’ लावून धरणार असल्याचे सांगितले. सरकारने पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम अद्याप जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीचा शेतकाऱ्यांबद्दल किती कळवळा आहे हे यावरून दिसून येते. उसाला हेक्टरी एक लाख रुपये व इतर पिकांना पन्नास हजार नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
कोल्हापूर महापालिकेच्या विकासकामांमध्ये 18% टक्केवारी घेतली जात असल्याचे एका व्हाट्सअप्प संभाषणातून समोर आले. यावर ‘आप’ने प्रतिकात्मक ‘हंडी फोड’ आंदोलन करुन या टक्केवारी बद्दलचा रोष दाखवून दिला. मतदारांनी कोल्हापुर महानगरपालिका आम आदमी पार्टीच्या हातात दिल्यास टक्केवारी बंद करू अशी ग्वाही कोल्हापूरकरांना देत असल्याचे सांगितले.
शालेय शिक्षण शुल्कात 15% सवलत द्यावी असे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु खाजगी शाळांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेतल्याने याची अंमलबजावणी झालेली नाही. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्यांना सवलत देऊन त्याची अंमलबजावणी करावी असे राचुरे म्हणाले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किशोर मंध्यान, संघटक विजय कुंभार, सचिव धनंजय शिंदे, संदीप देसाई, निलेश रेडेकर, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.