‘एनडीए’मध्ये मुलींनाही प्रवेश परीक्षा देता येणार, सुप्रिम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

टीम ऑनलाईन :
‘एनडीए’ अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी)ची दारं मुलींसाठीही खुली झाली आहेत. सुप्रीम कोर्टानं ‘एनडीए’मध्ये मुलींना प्रवेश घेता यावा, यासाठी त्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी दिली आहे. येत्या 5 सप्टेंबरला एनडीएची प्रवेश परीक्षा होत असून, त्यात पहिल्यांदाच मुलींनाही बसता येणार आहे.
नॅशनल डिफेन्स अकॅडमी व इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात दिल्लीतील वकील कुश कार्ला यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारला याप्रकरणी भूमिका मांडण्यास सांगितले होते.
याचिकेत म्हटले होते, की मुलांना 12 वीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, नौदल अकॅडेमीत प्रवेश घेता येतो; पण मुलींना सैन्यात भरती होण्यासाठी काय पर्याय आहेत? त्यांची सुरुवात वयाच्या 19 वर्षांपासून 21 वर्षांपर्यंत सुरु होते.
मुलींसाठी किमान शैक्षणिक पात्रताही पदवीधर ठेवली असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे सैन्यदलात केवळ पुरुषांनाच देशसेवेची संधी मिळते. महिलांना सैन्यदलात सेवा बजावता येत नसल्याचा दावा करण्यात आला होता.
विरोध करणाऱ्यांना फटकारलं..
सुप्रीम कोर्टानं महिलांना संधी देण्यास विरोध करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे. न्यायालयाने आदेश दिल्याशिवाय आपण काहीच करणार नाही का, अशी विचारणादेखील केली आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परीक्षेसाठी महिलांना बसण्यास सर्वाेच्च न्यायालयाने परवानगी दिला.