लवकर बरे व्हा, बाकीचं आम्ही बघतो : राज ठाकरे; ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची राज ठाकरेंनी घेतली रुग्णालयात भेट

ठाणे :
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पक्षाकडून फेरीवाल्यांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलीसही त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
तब्येतीची विचारपूस केली. लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. दोन गोष्टी आपण पाहणं महत्त्वाचं आहे. एक अधिकृत फेरीवाले आणि दुसरं अनधिकृत फेरीवाले. कालही मी म्हटलं त्याप्रमाणे जे काही घडलंय त्याचं दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.