महांतेश कवठगीमठ यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा; निपाणी भाग कार्यकर्त्यांची मागणी

कोगनोळी :
कर्नाटक राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांनी नुकताच पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचा येत्या रविवारी विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये कर्नाटक भाजप पक्षप्रतोद महांतेश कवठगीमठ यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी, अशी मागणी निपाणी भाग कार्यकर्त्यांच्या वतीने कोगनोळी येथील आयोजित पत्रकार परिषदेत विठ्ठल कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
महांतेश कवठगीमठ यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून बेळगाव जिल्ह्यामध्ये विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत. ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा व नगर पंचायतींना नगरपालिकेचा दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये कवठगीमठ अण्णा यांचे मोठे योगदान आहे. घरकुल योजना, गंगा कल्याण योजना, पानंद रस्ते याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांचे योगदान मोठे आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये एक संयमी, अजात शत्रू, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कर्नाटकामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत स्वतःला झोकून देऊन भारतीय जनता पक्ष मोठा करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सद्यस्थितीला मंत्रीपद सांभाळण्यासाठी एक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आज समाज पहात आहे त्यामुळे जर भारतीय जनता पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंतेश कवठगीमठ यांना संधी दिल्यास येऊ घातलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी नक्कीच पक्षाला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या मागणीची दखल घेऊन महांतेश कवठगीमठ यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी विठ्ठल कोळेकर यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना पद्मराज माणगावे म्हणाले की सर्वसामान्य मतदारांचा विचार करून प्रत्येक अशी जवळीकता सांभाळणारे ते एक व्यक्तिमत्व असून अशा व्यक्तीला संधी दिल्यास बेळगाव जिल्ह्यामध्ये विकासाचा डोंगर उभा राहील. तर सामाजिक कार्यकर्ते अनिल सुतार यांनी यावेळी कवठगीमठ यांना मंत्रिमंडळात पहिल्याच फेरीमध्ये सामावून घेण्याची मागणी केली.
यावेळी श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे प्रमुख ह भ प उद्धव काजवे, सुळगाव येथील मारुती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन चंद्रकांत मारुती सुतार, देवू कोळी, श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे संचालक, सल्लागार उपस्थित होते.