मुरगूड शहरात पोलिसांचा रूट मार्च

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आगामी शासकीय शिवजयंती व महाशिवरात्री सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मुरगूड पोलिस ठाण्याच्या वतीने एसटी स्टॅन्ड मुरगूड परिसरात दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली.
सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगूड एसटी स्टँड, मुरगूड नाका नं १, मुख्य बाजारपेठ, कबरस्थान, मशीद रोड मुरगूड अशा मार्गे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला.
सदर दंगल काबू योजना व रूट मार्च करिता मुरगुड पोलीस ठाण्याकडील २ अधिकारी, २० पोलिस अमलदार व आरसीपी मुख्यालय कडील १ अधिकारी, ३९ अंमलदार, १७ होमगार्ड सहभागी झाले होते.
या बरोबर मुरगूड ग्रामीण रुग्णालया कडील वैद्यकीय अधिकारी व अॅम्बुलन्स पथक, मुरगूड नगरपरिषद कार्यालयाकडील अग्निशमन दलाचे पथक ही या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. ही मोहीम पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे व पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे यांचे नेतृत्वाखाली राबविण्यात आली.