मुरगूड येथे रुग्णांवर आता होणार मोफत डायलिसिस

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे एचएलएल कंपनीमार्फत ग्रामीण भागामध्ये डायलिसिस सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयाची त्यात निवड केली आहे. येथे पाच डायलिसिस युनिट कार्यरत होणार आहेत. लवकरच मोफत डायलिसिस उपचार सुविधा सुरू होणार आहेत. महिनाभरामध्ये हा डायलिसिस विभाग सुरू होण्याची अपेक्षा आहे.
मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधील अतिदक्षता विभागामध्ये ही डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दोन शिफ्टमध्ये दररोज दहा रुग्णांवर डायलिसिस करण्यात येणार आहे. यासाठी एक डॉक्टर, दोन टेक्निशियन, एक नर्स आणि दोन परिचर अशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.
दोन एक दिवसांत या विभागाचे काम सुरू होत असून, महिन्याभरात ही सुविधा प्रत्यक्ष रुग्णांसाठी सुरू होणार आहे. येथे दोन शिफ्टमध्ये दररोज दहा रुग्णांना ही सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. –
डॉ. अमोल पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मुरगूड