सीपीआरमध्ये एचआयव्ही संसर्गितांसाठी डायलेसीस त्वरीत सुरु करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
सीपीआरमध्ये जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गितांचे डायलेसीस होत नाही ही गंभीर बाब असून ही डायलेसीस सेवा त्वरीत चालू करण्याच्या सक्त सुचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी अधिष्ठाता डॉ. बरगे उपस्थित होते. आॉनलाईन पध्दतीने संपन्न झालेल्या या सभेस विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
शासकीय महाविद्यालयात ११ डायलेसीस मशीन असूनसुद्धा एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे डायलेसीस केले जात नाही अशी तक्रार सामाजिक संस्थांनी केली. जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, एक डायलेसीस मशीन एचआयव्ही संसर्गितांसाठी राखीव ठेवण्यात यावे. शासनाची सेवा उपलब्ध असूनही रुग्णांना ती मिळत नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये जावे लागते. ज्या रुग्णांची परिस्थिती नाही, त्यांचे काय? असा प्रश्न जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ही सेवा तत्काळ चालू करण्यात यावी. जिल्ह्यामध्ये काही एचआयव्ही संसर्गित रुग्ण एआरटी औषधे घेत नाहीत. या रुग्णांचा शोधही ताबडतोब घेण्यात यावा, अशा सक्त सुचना त्यांनी दिल्या.
उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज या ठिकाणी रक्त साठवण केंद्र कार्यान्वित असून, कोडोली व इचलकरंजी या ठिकाणी ते लवकरच सुरु होत आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्ताअभावी शस्त्रक्रिया खोळंबली जाऊ नये यासाठी, सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्येही वैद्यकीय अधिक्षकांच्या जबाबदारीने रक्तसाठवण करण्यात येऊन ग्रामीण रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रिया व बाळंतपणाची संख्या वाढविण्याच्या सुचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी व्हायलाच हवी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्याबरोबर खासगी दवाखान्यांनीही प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी महिन्याला अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
देहविक्रय करणाऱ्या महिलांना कोवीड काळातील अनुदान जमा करण्याचे काम पुर्णत्वास आले असून, या महिला, तृतीयपंथी, समलिंगी संबंध ठेवणारे यांच्या मतदान नोंदणीचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी एचआयव्ही, टीबी, माहिती, ज्ञान, संवाद यावर चर्चा झाली.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा दिला. तर स्वागत जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी केले. या सभेत प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार , कार्यक्रम अधिकारी रमेश वर्धन यांच्यासह जिल्ह्यातील एआरटी केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी आॉनलाईन सहभाग घेतला.