मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच साठी संसदेत पाठपुरावा : माजी खासदार संजय मंडलिक ; लाखो पक्षकारांना न्याय मिळाल्याचे समाधान.

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सहा जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत संसदेच्या अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती माजी खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ४० वर्षाच्या अनेकांच्या लढ्याला यश आल्याचे समाधान वाटते. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू होत असून रविवारी १७ ऑगस्ट रोजी शानदार सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश भूषण गवई यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होत आहे , या पार्श्वभूमीवर खंडपीठासाठी केलेल्या पाठपुराव्या बाबत सविस्तर माहिती माजी खासदार मंडलिक यांनी दिली.
माजी खासदार मंडलिक म्हणाले, “२०१९ ते २०२४ या १७ व्या लोकसभेच्या पाच वर्षाच्या कालावधीत खासदार म्हणून कार्यरत असताना कोल्हापूर, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत मी संसदेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तसेच केंद्रीय कायदा व न्यायमंत्री किरेन रिजीजू यांचेकडे पत्राद्वारे व समक्ष भेटून सातत्याने लोकभावनेचा पाठपुरावा केला.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सह कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील जनतेच्या सोयीसाठी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन करावे यासाठी ४० वर्षाहून अधिककाळ सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. त्यासाठी कोल्हापूर बार असोसिएशन, खंडपीठ कृती समिती, जनता, लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे या सर्वांच्या सामुहिक प्रयत्न कारणीभूत ठरले. खंडपीठ मागणीच्या लढ्यात वेळोवेळी मी सक्रीय सहभाग घेतला. सर्किट बेंच स्थापना ही कोल्हापूर नगरीच्या विकासातील एक मैलाचा दगड ठरणारी महत्वाची बाब आहे.
या सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सांगली, साता-यासह, सोलापूर , रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील जनता, वकील, पक्षकार यांची मोठी सोय झाली असून जनतेचा वेळ व पैशाचीही बचत होणार आहे. यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. याचे व्यक्तीशः मला मोठे समाधान वाटते.
खंडपीठ मंजूरीसाठी देशाचे सरन्यायाधिश मा. भूषण गवईसो यांचे मोठे योगदान आहे. कोल्हापूर येथे मा. उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणेसाठी माझे वडील व कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे तत्कालीन खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी संसदेमध्ये सातत्याने मागणी केली होती. तसेच बार असोसिएशनसह जनतेच्या प्रत्येक आंदोलन व लढ्यामध्ये त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.
सर्किट बेंचच्या मागणी बरोबरच मा. न्यायाधिशांच्या रिक्त जागा भरणे, सरकारी वकीलांसह कोर्टातील रिक्त पदे भरणे, ई-कोर्ट, ग्राम न्यायालय योजना या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठीही मी संसदेमध्ये सातत्याने प्रश्नोत्तर व चर्चेच्या माध्यमातून पाठपुरावा केला.
कोल्हापूर येथील सर्किट बेंच मंजूरीमुळे कोल्हापूर येथे विभागीय महसूल आयुक्त, पोलीस आयुक्त, कृषी विद्यापीठ स्थापनेबरोबर पर्यटनासह, विमान, रेल्वे, आय.टी. सह अनेक कार्यालये स्थापन होणेचा मार्ग सुकर झाला असून लवकरच कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रमुख केंद्र बनेल.” असा ठाम विश्वास माजी खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.