वेदगंगेच्या महापुराची कारणे शोधा अन्यथा वेदगंगाकाठ बचावासाठी रस्त्यावर उतरु ; २२ पूरग्रस्त गावांतील सरपंचांच्या बैठकीत मागणी

मुरगुड प्रतिनिधी :
प्रतिवर्षी वेदगंगा नदीला महापूर येत आहे. सन २००५ व २०१९ पेक्षाही यंदाच्या महापुराची पातळी तीव्र होती. नदीवर उभारलेले बंधारे, पुलांचे भराव किंवा अन्य कोणते घटक पूरस्थितीला कारणीभूत आहेत, याची कारणमीमांसा शासनाने शोधून नदीकाठचा उद्ध्वस्त होणारा शेतकरी वाचवला पाहिजे, अशी मागणी भडगाव येथे वेदगगंगा नदीकाठ शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित २२ पूरबाधित गावांतील सरपंच बैठकीत करण्यात आली.
यावेळी पूरग्रस्तांना शंभर टक्के कर्ज माफी द्यावी, मुरगूड शहरातील वेदगंगेत थेट मिसळणारे सांडपाणी बंद करावे. पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, असे ठराव करण्यात आले. यावेळी दिलीप पाटील (यमगे), दिगंबर अस्वले (मळगे बुद्रुक), अमित पाटील (निढोरी), बी. एम. पाटील (भडगाव), जयवंत पाटील (बस्तवडे), उमेश पाटील(आणूर), दत्तात्रय सावंत (बानगे) विजय पाटील (मळगे खुर्द), युवराज कमळकर (मळगे बुद्रुक), दिनकर कुंभार (कुरुकली), आनंदा तोडकर (आणुर), महादेव चौगले (म्हाकळे इत्यादी गावचे सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक भडगावचे सरपंच दिलीप चौगले यांनी केले. तर आभार अजित मोरबाळे (शिंदेवाडी) यांनी मानले.