ग्रंथपाल अमर पाटील यांच्या वारसांना सव्वा दोन लाखांची आर्थिक मदत; ग्रंथालय कर्मचारी संघटना व मुरगूडकरांचे दातृत्व.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अवघ्या ३६व्या वर्षी वीजेच्या धक्क्याने अपघाती निधन झालेल्या मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयाचे ग्रंथपाल अमर पाटील यांच्या वारसांना समाजाचे सव्वा दोन लाख रुपयाचे दातृत्व लाभले.
कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघटना आणि मुरगूड शहरातील देणगीदारांनी जमा केलेली ही मदत स्व.अमर पाटील यांच्या कुटूंबाकडे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे होते. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे राज्याध्यक्ष ग्रंथपाल रवींद्र कामत यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली.
राज्याध्यक्ष कामत म्हणाले , ” ग्रंथपाल स्व. पाटील हसतमुख व्यक्तिमत्व वअजातशत्रू व्यक्तीमत्व होते.त्यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबाचा आधारवड हरपला तर ग्रंथालय चळवळीची हानी झाली आहे . सामाजिक कार्यात अग्रेसर , चळवळीसाठी दिलेले योगदान व अजातशत्रु व्यक्तिमत्वामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघ तर जिल्ह्याबाहेरील अनेक लोकांनी अमरच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला.त्यातून सुमारे दीड लाख रुपये जमा झाले. “
वाचनालयाचे सचिव शिवाजीराव चौगले म्हणाले. ” ग्रंथपाल अमर पाटील यांच्या अकाली निधनाने वाचनालय व वाचन चळवळीची मोठी हानी झाली आहे.तसेच त्यांचे कुटुंब आधारहीन झाले आहे. मुरगूड शहरातून त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यास मुरगूडकरांनी प्रतिसाद दिला. त्यातून सुमारे ७५ हजार रुपये जमा झाले. “
ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांनी अमरच्या सामाजिक व वाचन चळवळीच्या कार्याचा आढावा घेत ज्येष्ठ नागरिक संघाकडून १३ हजार रुपयाची मदत कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.
यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र तानाजीराव मगदूम ,युवराज चौगले (पाचवडे) जोतीराम मिसाळ (अर्जुनी ) ,धनाजी मांगले (चिमगाव ) , प्रकाश पाटील व सौ कल्पना पाटील (मोघर्डे) , बाळासो पाटील (बेनिक्रे), संदीप जाधव (दौलतवाडी ),नामदेव पाटील (गुडाळ) , आप्पासो पाटील (मुदाळ ) ,राजाराम फेगडे (बेनिक्रे), नदीम बामणे (बेनिक्रे ) दत्तात्रय पाटील ,राहुल पाटील ,आदिनाथ पाटील कु .कादंबरी पाटील ,कु श्लोक पाटील ,पी.डी. मगदूम,शिवाजी सातवेकर, सुरेश सोनगेकर, आनंदा मांगले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघ व वाचनालय चळवळीतील मान्यवर उपस्थित होते.
हुतात्मा वाचनालयाचे संचालक अविनाश चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार ग्रंथपाल जोतीराम मिसाळ यांनी मानले.