शालिनी पॅलेस परिसरात फिल्मी स्टाईलने गोळीबार : मानसिंग बोंद्रे चा अटकपुर्व जामिन अर्ज फेटाळला

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शालिनी पॅलेस परिसरात फिल्मी स्टाईलने गोळीबार केल्या प्रकरणी संशयित मानसिंग बोंद्रे याच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, घटना घडल्यापासून तो फरार आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर २१ डिसेंबरला युक्तिवाद झाला होता. त्याची आज अंतिम सुनावणी होवून अटकपूर्व जामिन फेटाळला.
दसरा चौक येथील छत्रपती शाहू शिक्षण संस्था आणि शेत जमिनीच्या मालमतेच्या वादातून फिल्मी स्टाईलने गोळीबार केल्याचा प्रकार 12 डिसेंबरच्या मध्यरात्री घडला होता. या गोळीबाराचे चित्रीकरण करून ते संशयित मानसिंग बोंद्रे याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी मानसिंग बोंद्रे याचा सावत्र चुलत भाऊ अभिषेक बोंद्रे याने आपल्याला धमकावत हा गोळीबार केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिसात दिली होती. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्यापासून संशयित मानसिंग बोंद्रे फरार आहे. संशयित आरोपी मानसिंग बोंद्रे याने आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. बोंद्रे याचे वकील ऍड. शिवाजीराव राणे यांनी बोंद्रे याला अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून २१ डिसेंबरला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी एम विठ्ठलानी यांच्या समोर आपली बाजु मांडली होती. त्या अटकपूर्व जामिनावर आज अंतिम सुनावणी होती. सुनावणीमध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश विठ्ठलानी यांनी अटकपूर्व जामिन फेटाळला.