शेती विषयक : खतांच्या किमती वाढणार ; अर्थकारण बिघडणार

कृषी टिम ऑनलाईन :
रशिया-युक्रेन युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसत असून, त्यातून विविध वस्तूंच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे, असे असताना आता शेतीसाठी वापरण्यात येत असलेल्या खतांच्या किंमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या युद्धाची झळ महागाईमुळे सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत पोहचलेली असताना खताच्या दरवाढीतून ती आता शेताच्या बांधापर्यंत पोहचणार आहे. येत्या दोन महिन्यांनतर शेतीच्या खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. शेतीतून जादाच उत्पादन मिळावे म्हणून शेतकऱ्यांकडून सर्रासपणे खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
त्यातून, खत खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची बाजारपेठेमध्ये उलाढाल होते. त्याप्रमाणे यावर्षीही होणार आहे. खतांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पोटॅशची आवश्यक असलेली आयात भारतात रशियाकडून केली जाते. मात्र, सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर रशियासह अन्य देशांकडून होणारा पोटॅश व फॉस्फरसच्या कच्चा मालाचा पुरवठा काही प्रमाणात कमी झाला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम खतांच्या किंमतीवर होऊन त्यातून, खताच्या किंमतीमध्ये दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामध्ये खताच्या किंमतीमध्ये सुमारे चारशे ते पाचशे रुपयांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास या युद्धाची झळ शेताच्या बांधापर्यंत पोहचणार असून शेतकऱ्याला खत दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. खताची मर्यादित उपलब्धतता राहिल्यास आणि दरवाढ झाल्यास खरीप हंगामाला सुरवात झाल्यानंतर या युद्धाचे कारण देऊन मोठ्या प्रमाणात खताचा काळा बाजार होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
शेतीपंप नको रे बाबा
कोकणातील अनेक भागातील शेती वरूणराजाच्या कृपेवर अवलंबून आहे. भातशेतीच्या लावणीसाठी शेतकऱ्यांना पेट्रोल वा डिझेलवर चालणाऱ्या पंपाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, या युद्धामुळे आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे गगनाला भिडलेल्या या दराने पेट्रोल वा डिझेलचा उपयोग केल्यास शेतीचे अर्थकारण बिघडणार आहे. त्यामुळे यावर चालणारा शेतीपंप नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊन ठेपलेली आहे.
तेलासह अन्य विविध वस्तूंच्या वाढलेले दर आणि त्यातून झालेल्या महागाईने आधीच कंबरडे मोडले आहे. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे शेती करणे मुश्किल झाले आहे. अशा स्थितीत खतांच्या दरांमध्येही वाढ झाली तर शेती करणे अधिकच अवघड होऊन जाईल.