राधानगरी तालुक्यातून गोकुळसाठी नेमका कुणाचा कस लागणार . . .?दोन्ही पॅनेलकडून एक विद्यमान तर दोन नव्या चेहऱ्यांना संधी

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
निवडणूक म्हंटल की जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाची आणि नेतृत्वाची कसं लागणारी निवडणूक म्हणजे गोकुळ होय. नुकतीच आता माघार झाल्याने सत्तारुढ आघाडी व विरोधी पॅनेल कडून राधानगरी तालुक्यातुन प्रत्येकी तीन तीन उमेदवार निश्चित झाले आहेत.त्यामध्ये विद्यमान दोन संचालकामध्ये अरुण डोंगळे,पी.डी. धुंदरे, याच बरोबर चार नवीन चेहऱ्यांना नवीन संधी मिळाली आहे. त्यामध्ये, प्रा.किसन चौगले,अभिजित तायशेटे,राजेंद्र भाटळे, रविष पाटील आदी. या मध्ये कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे. हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम लागल्यापासून गोकुळच्या या निवडणुकीत रंग भरत गेला. नेतृत्वही आपला कस टिकवण्यासाठी दोन्ही बाजूकडून सक्रिय झाले. सत्तारुढ आघाडीकडून आमदार पी. एन.पाटील,महादेवराव महाडिक तर विरोधी आघाडीकडून सतेज पाटील,हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व पुढे आले.अनेकांनी दोन्ही पॅनल कडून उमेदवारी अर्ज भरले होते.अनेकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी अंतर्गत फिल्डिंग लावली होती पण तुल्यबळ आणि जनसामान्यातील संपर्क पाहता दोन्ही बाजुकडून राधानगरी तालुक्यातून उमेदवार निवडले गेले.अनेकांचा पत्ता कट झाला.अनेकजण निराशही झाले.निराश झालेले उमेदवार काय भुमिका घेतात हे देखील महत्वाचे आहे. विद्यमान संचालकासह नवखे चार उमेदवार आपल्या प्रतिमेचा आणि जनसंपर्क याचा कसा फायदा उठवतात हे पहावे लागेल.
राधानगरी तालुक्यातील दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी ठराव धारकांच्या भेटीगाठीसाठी जिल्हा ढवळून काढला आहे.आपण कसे योग्य आहे हे ठराव धारकांना पटवून देण्यात सर्वच उमेदवार यशस्वी ठरले आहेत.
दोन्ही पॅनल मधून एक-एक उमेदवार विद्यमान संचालक पद भोगत असून संघाच्या माध्यमातून यांनी तालुक्यात आपले कसे वलय निर्माण केले आहे. दूध संस्थेच्या परिणामी शेतकरी सभासदांच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न झाला आहे का?ही देखील भूमिका विजयासाठी निर्णायक ठरणार आहे.तर इथून मागच्या सत्तेत असताना जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटये, पंचायत समिती माजी उपसभापती रविष पाटील, तर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या सौ.सविता भाटळे यांचे पती राजेंद्र भाटळे,किसन चौगले आदींनी ही तालुक्यात आपापल्या परीने जनतेत आपला नावलौकिक टिकवून ठेवला आहे.
होणारी निवडणूक ही दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांसाठी सहज आणि सोपी नाही. प्रत्येकाला निवडून आणि विजयाचा गुलाल उडवण्यासाठी आपल्या कौशल्याचा, बुद्धिमत्तेचा, जनसंपर्काचा,आणि केलेल्या विकासकामांचा पाढा हा ठराव धारकांच्या समोर पुन्हा पुन्हा गिरवावा लागणार आहे. राधानगरी तालुक्यातून ठराव धारक असून नेमक्या कोणत्या उमेदवाराला पसंती देतात. तसेच कोणता उमेदवार जिल्ह्यातून जास्तीत जास्त मतदान घेणार हे सुध्दा महत्त्वाचे असणार आहे.त्याचं बरोबर दोन्ही पॅनल कडून कोणते पॅनल एक गठ्ठा मतदान प्राप्त करणार आहे. त्याचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचे जाणकारांतुन बोलले जात आहे.तालुक्यातील दोन्हीही आघाडीचे नेते आपल्या पॅनेलचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्नशील आहेत.जरी असे असले तरी ही लढाई चुरस निर्माण करून जाणार आहे हे निश्चित.
नव्या चेहऱ्याना संधी . . .
नव्या चार उमेदवार चेहऱ्यामधून अभिजित तायशेटे, रवीश पाटील कौलवकर,प्रा.किसन चौगले,राजेंद्र भाटळे हे चारही उमेदवार गोकुळ मधील अस्तित्वाची लढाई लढणार आहेत.असे असले तरी संचालक नेमके कोण ? हे मात्र जिल्ह्यातील ठराव धारक आपल्या मतदानातून ठरवणार आहेत.