मोठी बातमी : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

राज्यात सद्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मराठा आरक्षण.. याचा बाबत आता मोठे अपडेट समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने मंगळवारी घेतला.
राज्यात सर्वच ठिकाणी आज, बुधवारपर्यंत शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण होणार नसल्याने सर्वेक्षणाच्या कामासाठी मंगळवारी मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या शुक्रवारपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्वेक्षण करतांना नेमकी अडचण काय ?
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागास आयोगाने 23 जानेवारीपासून सर्वेक्षणास सुरुवात केली. त्यासाठीचे ‘अँप’ गोखले इन्स्टिट्यूटने तयार केले होते.
सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवसापासून ‘अँप’मध्ये अनेक तांत्रिक अडथळे आल्याने त्याचा फटका सर्वेक्षणाला बसला आहे. राज्यातील अनेक गावांची नावे ‘अँप’मध्ये दिसत नव्हती त्यामुळे त्या ठिकाणी सर्वेक्षण होऊ शकले नाही.
दरम्यान, काही ठिकाणी सर्वेक्षणासाठी आणखी कालावधीची आवश्यकता असल्याने या सर्वेक्षणासाठी दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.