शोषण अत्याचारमुक्त समाजासाठी प्रबोधित कार्यकर्त्यांची गरज: लक्ष्मण माने ; निढोरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
“80 कोटी लोकांना घरबसल्या कोणतेही शारीरिक व बौद्धिक श्रम न करता फुकट धान्य व पैसे देणाऱ्या योजना या विकास योजना नव्हेत तर देशवासीयांना आळशी, दरिद्री अवलंबून राहण्यास भाग पाडणारे घातचक्र आहे”. असा घणाघात “उपरा” कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केला.
निढोरी ता. कागल येथे ॲटवन्स ग्रुपने आयोजित केलेल्या “वर्तमानात महापुरुष समजून घेताना” या विषयाची मांडणी करताना माने बोलत होते.अध्यक्षस्थानी निवृत्त विक्रीकर निरीक्षक सुखदेव बळवंत सागर होते.
लक्ष्मण माने म्हणाले “शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याशिवाय देशावरचं आर्थिक,सांस्कृतिक आणि राजकीय संकट टळू शकणार नाही. बहुजनांचा तोंडावळा नाव असणारी पोरं सार्वजनिक ठिकाणी सहजपणे बहुजन महापुरुषांचा अपमान करतात.आपली वंशावळ बुद्ध,चार्वाक, महावीर, संत कबीर तुकोबा छत्रपती शिवाजी महाराज पासून यांच्यापासून पानसरे कलबुर्गीं पर्यंत चालत आलेली आहे ही वैचारिक वंशावळ जपल्या शिवाय गुलामगिरी नष्ट होणार नाही.विचारवंतांच्या विचारांना बळ देण्याची संघटित होण्याची आणि संघर्ष करण्याची गरज आहे.दर्जेदार शिक्षण, आरोग्य, वीज, रोजगार, पाणी व अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत ते आपले अधिकार आहेत. शासनाने या मोफत पुरवल्या तरच माणूस बौद्धिक प्रगत होऊ शकतो. देश, धर्म प्रेम, परधर्मद्वेष यामध्ये देशातील बहुसंख्य लोकांना गुंतवून आपल्या श्रमाची अधिकाराची लुबाडणूक केली जात आहे.”
याप्रसंगी विविध क्षेत्रातील यशस्वीतांचा पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि दहावीतील यशस्वीयांचा सत्कार करण्यात आला.
संयोजक देवानंद पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले,” बहुजनांच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या विचारवंतांचा सर्वात मोठा अनादर बहुजनांच्या कडूनच होतो. हे दुर्दैवी आहे. वाचन करा. प्रबोधित झालेल्या तरुणांनी ही लढाई हाती घेतली पाहिजे डोके ताळ्यावर ठेवून आपला शत्रू ओळखा”.
आंबेडकर जयंती लोकोत्सव करणाऱ्या देवानंद पाटील यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर-बेळगाव यांच्यावतीने करण्यात आला. सुखदेव सागर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.यावेळी बी.के.पाटील,भिकाजी मोरबाळे,राजेंद्र पाटील,सुशील जोंधळे,रणजीत खेबुडे,भैरवनाथ मगदूम,रंगराव रंडे,शामराव सावंत, गणपत मगदूम, भगवान शेटके उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत बी.एल.कांबळे , प्रास्ताविक देवानंद पाटील यांनी केले केले. तर निवेदन विजय काळे यांनी केले.आभार सविता चौगले यांनी मानले.
महापुरुषांना जातीच्या चौकटीबाहेर काढणारा पुरोगामी कार्यकर्ता देवानंद पाटील : लक्ष्मण माने
“महापुरुषांना जाती धर्माच्या चौकटीत अडकवणाऱ्या समाजात भीमवस्तीतील आंबेडकर जयंती गावात भर चौकात लोकोत्सव म्हणून साजरी करणारा देवानंद पाटील महाराष्ट्रातील उज्वल उदाहरण आहे. देवानंद यांच्यासारखे दहा हजार पुरोगामी प्रबोधित कार्यकर्ते तयार झाले आणि काम करू लागले तर महाराष्ट्रात पुरोगामी विचार पुनर्स्थापित होईल.”