कोल्हापूर विधान परिषदेत निवडणूक : सतेज पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार ; माजी खासदार धनंजय महाडीकांचा दावा

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार सतेज पाटील यांनी गेल्या सहा वर्षात सर्वांच्याच कळा काढल्या आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते त्यांच्यावर चिडून आहेत. आत्ता जरी ते त्यांच्या व्यासपीठावर दिसत असले तरी हेच नेते विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार आहेत, असा दावा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सतेज पाटील यांच्या पराभवाचे भाकीत केले आहे. महाडिक म्हणाले की, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांना सत्तेत असूनही पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून हवे तसे पाठबळ मिळालेले नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नावाची चिठ्ठी देऊनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला गोकूळ दूध संघामध्ये संचालक होता आले नाही. ही नाराजी मतातून स्पष्टपणे दिसेल.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक १०५ लोकप्रतिनिधी मतदार आहेत. आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे गट मिळून आमची मतदारसंख्या १५५ पर्यंत जाते. आमच्या विरोधातील उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांच्या पक्षाचे केवळ ३६ मतदार आहेत.