कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार

रोहन भिऊंगडे/
कोल्हापूर, दि. 27 : राज्यात सद्यस्थिती कोरोना ची परिस्थिती गंभीर असल्याने समाजातील अनेक घटकांना त्याचा फटका बसत आहे. त्यात विविध विभागांचे शासकीय अधिकारी कर्मचारी यांना देखील या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी शासकीय अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.त समाज कल्याण विभागात देखील अनेक अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाची लागण झालेली आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढावे, परिस्थितीशी मुकाबला करता यावा, तसेच त्यांना वैद्यकीय मदत हवी असल्यास, त्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुणे विभागातील समाज कल्याण अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घेतला आहे.
समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या सुचनानुसार पुणे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे नोडल/संपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या सहकार्याने व समन्वयाने कर्मचाऱ्यांना योग्य ती मदत केली जाणार आहे. पुणे विभागातील बहुतांशी जिल्ह्यातील अधिकारी हे जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखालील कोविड संदर्भात कामकाज पाहत आहेत. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले दवाखाने व बेड संदर्भात त्यांच्याकडे असल्याने त्याचा विभागातील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विभागीय स्तरावर कोविड सपोर्ट व्हाट्सप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचार्यारला लागण झाल्यास तात्काळ माहिती उपलब्ध होत असल्याने आवश्यक ती मदत लवकरात लवकर देणे सोयीचे होत आहे.
व्हट्सप ग्रुपच्या माध्यमातून सकारात्मक बाबी देखील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे त्या त्या जिल्ह्यात कोविडची रोजच्या रोज अध्यायावतत माहिती/ परिस्थिती कर्मचाऱ्यांना उपलब्ध होऊ लागले आहे. कर्मचाऱ्यांना बरोबरच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
समाजकल्याण विभागाचे विभागातील बहुतांशी शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा याठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे असल्याचे मत विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री बाळासाहेब सोळंकी यांनी व्यक्त केला असून त्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असल्याचे सांगितले आहे. तसेच विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी यांचे लवकरात लवकर लसीकरण देखील युद्धपातळीवर करण्यात येणार असल्याचेही श्री सोळंकी यांनी सांगितले आहे. विभागाच्या या उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचारी यांना वैद्यकिय मदतीबरोबरच त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.