ताज्या बातम्या

सर्वाधिक ऊस दर व उभा केलेल्या प्रकल्पांच्या यशस्वीतेमुळे बिद्री राज्यात चर्चेत : अध्यक्ष के. पी. पाटील.

गारगोटी  :

गेल्या एकोणीस वर्षांच्या बिद्रीच्या जडणघडणीत आम्ही दिलेले योगदान व उच्चांकी ऊस दर, सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आणि वाढीव गाळपक्षमता प्रकल्प अशा विविध पूरक प्रकल्पांना मिळालेल्या यशामुळे बिद्री राज्यात चर्चेत राहिला असल्याचा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.
ते मुदाळ ( ता. भुदरगड ) येथे प. बा. पाटील शिक्षण संकुलात आयोजित सभासद संवाद प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पांडुरंग विष्णू पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य के. ए. पाटील यांनी केले .
यावेळी बोलताना के. पी. पाटील पुढे म्हणाले, केवळ ऊस आणि साखर यावरच सभासदांना चांगला दर देता येणार नाही. यासाठी पूरक प्रकल्प म्हणून वीस मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभा केला. हा प्रकल्प बिद्रीच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरला. वाढीव गाळप क्षमता विचारात घेऊन, सात हजार पाचशे मेट्रिक टन प्रती दिन विस्तार करून हा हंगाम यशस्वी केला. तर साठ के.एल.पी.डी. क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प पूर्णत्वाला नेला आहे.
प्रगतीचे अनेक टप्पे पार करत बिद्रीचे आणि सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. बिद्रीच्या या निवडणुकीत सामान्य सभासदांची फौज आपल्याबरोबर आहे. मुदाळच्या सभासद बंधू भगिनींनी श्री.महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मुदाळचे माजी सरपंच विकासराव पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमावेळी जिल्हा बँक व गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, दिनकरराव अडसूळ, संभाजीराव पाटील, के डी पाटील, दत्तात्रय पाटील,एम.एस.पाटील, उपसरपंच महेश पाटील,संग्रामसिंह पाटील,शांताराम पाटील,रंगराव बा. पाटील आदीसह मुदाळ गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks