ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“शाहू”च्या शेतकऱ्यांना ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध करून देणार ; जिल्ह्यातील पहिल्याच प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद : राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी. विजय मोरबाळे

ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक उपक्रमशील प्रयोग राबवित असताना ड्रोनद्वारे खत फवारणी तंत्रास प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळे ड्रोनद्वारे “शाहू”च्या शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे.अशी घोषणा शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.

श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत कागल येथील शेतकरी श्री. शंकर पोवार यांच्या ऊस पिकावर ड्रोनतंत्राद्वारे फवारणीचे जिल्ह्यातील पहिले प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ,कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यामार्फत उसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्याची परंपरा निर्माण केली आहे.तीच पुढे चालविताना ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने नवनवीन प्रयोग राबविण्यात येत आहेत. ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र उंच वाढलेल्या ऊस पिकात मजूरांकरवी फवारणी करता येत नाही. तसेच मनुष्यबळाअभावी इच्छा असूनही शेतकऱ्यांना या फवारण्या वेळेत घेता येत नाहीत. यावर पर्याय म्हणून अत्याधुनिक तंत्राद्वारे तयार केलेले ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना याची माहिती व फायदा व्हावा. यासाठी याचे प्रात्यक्षिक घेतले आहे.

चातक इनोवेशनचे कार्यकारी संचालक श्री. सुभाष जमदाडे म्हणाले, या ड्रोन तंत्रामुळे पारंपरिक फवारणीच्या तुलनेत सर्वच बाबतीत किमान खर्चामध्ये कमाल फायदा होतो. त्यामध्ये आठ ते दहा मिनिटांत मिनिटात एक एकर ऊस पिकाची फवारणी पूर्ण होते. एकरी आठ ते दहा लिटर पाण्याचा औषधासहित वापर, समांतर खोलवर व एकसमान फवारणी होते. 30 ते 40 टक्के औषधांमध्ये बचत होते. जमिनीची सुपीकता राखण्यास उपयुक्त ठरून वेळ, श्रम, खर्च, औषधे यांचीही बचत होते.शिवाय सुरक्षितपणे फवारणी केली जाते. विद्राव्य खते, जिवाणू, कीटकनाशके, ऊस पीक वाढीसाठी आवश्यक संप्रेरके यांची फवारणी करता येते.

स्वागत ऊस विकास अधिकारी के.बी.पाटील यांनी केले.संचालक यशवंत माने यांनी आभार मानले.

समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित उपक्रम

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ड्रोन तंत्राद्वारे फवारणीसाठीच्या प्रात्यक्षिक आयोजन केले. यंत्राची किंमत जास्त आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकऱ्यांना घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यासाठी कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना फवारणीची सुविधा मिळणार आहे. कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे.त्यासह श्री.घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित या प्रात्यक्षिकाच्या उपक्रमाचे सभासदांतून कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks