Donald Trump : ट्रम्प सरकारनं टॅरिफमुळं भारत-पाक शस्त्रसंधी झाल्याचं म्हटलं, भारत सरकारनं दावा फेटाळला, नेमकं काय म्हटलं?
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार टॅरिफचं समर्थन केलं जात होतं. मात्र, अमेरिकेतील न्यायालयानं त्यांना धक्का दिला आहे.

नवी दिल्ली :
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधीसाठी सहमती झाल्याचं दोन्ही देशांच्या अगोदर जाहीर केलं होतं. ट्रम्प यांच्याकडून भारत पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीसंदर्भात वेगवेगळी मतं व्यक्त करण्यात आली आहेत. आता ट्रम्प प्रशासनानं आणखी एक दावा केलेला आहे जो भारत सरकारनं फेटाळून लावला आहे. न्यूयॉर्कच्या एका न्यायालयात ट्रम्प सरकारमधील वाणिज्यमंत्री हॉवर्ड लटनिक यांनी टॅरिफमुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी होण्यास मदत मिळाल्याचं सांगितलं. भारत सरकारच्या विदेश मंत्रालयानं हा दावा फेटाळला आहे.
ट्रम्प सरकारनं काय दावा केला?
न्यूयॉर्कमधील केंद्रीय न्यायालयात जगभरातील सर्व देशांवर ट्रम्प प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या परस्पर शुल्कासंदर्भातील प्रकर सुरु आहे. बुधवारी कोर्टानं त्यांच्या निर्णयात ट्रम्प प्रशासनाच्या लिबरेशन डे टॅरिफला अवैध जाहीर करत स्थगिती दिली होती. या दरम्यान ट्रम्प सरकारमधील वाणिज्य मंत्री हॉवर्ड लटनिक यांनी टॅरिफच्या मदतीनं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी करण्यात मदत मिळल्याचं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना व्यापाराची ऑफर दिली, ज्यामुळं शस्त्रसंधीची स्थिती बनली. अमेरिकेतील ट्रम्प सरकारचा हा दावा भारतानं पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.