डॉक्टर, मेडीकल दुकानदारांनी कोविड रुग्णांची नोंद ठेवावी : जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या, कोविड लक्षणे असणाऱ्या रुग्णांची नोंदवहीत नोंद ठेवावी, तसेच मेडीकल दुकानदारांनीही कोविड लक्षणे असणाऱ्या रुग्णांना औषध देताना औषध वाटप वहीत नोंद करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.
खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करुन घेणे बंधनकारक आहे. ताप, सर्दी, खोकला डोकेदुखी, श्वसनाचा त्रास असलेली व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषध दुकानदाराकडे औषध मागत असेल तर दुकानदाराने त्याला डॉक्टरमार्फत उपचार करुन औषध घेण्यास प्रवृत्त करावे.
कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्ती औषध घेण्यास आल्यास त्यांनी त्यांच्या नोंदवहीत नोंद करुन ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्याच्या सूचना दुकानदारांनी द्याव्यात. कोविड सदृश लक्षणांची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नयेत. औषध दुकानदार यांच्या नोंद वहीतील माहिती दररोज गोळा करण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.