पाच दशकांपूर्वीचे शिस्तप्रिय, आदर्श शिक्षक व्यक्तिमत्व : बुजवडेचे शिरपा गुरुजी

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
गावातील कोणीतरी व्यक्तीने “शिरपा” गुरुजी आले आहेत, असा नामोल्लेख जरी केला तर शाळेत आणि शाळेभोवती स्मशान शांतता पसरायची आणि सारी शाळा चिडीचूप व्हायची,वर्गात विद्यार्थी आहेत की नाही असा प्रश्न देखील शाळेशेजारून येणा – जाणाऱ्यांना पडायचा एवढी शिस्त शिक्षणक्षेत्रात पाच दशकांपूर्वी होती. गुरुजींनी ज्या ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले त्या ठिकाणी निश्चितच आपला शिस्तीचा दरारा कायम ठेवला.असे सेवानिवृत्त आदर्श असे शिस्तप्रिय गुरुजी कोण होते हे आजच्या पिढीला निश्चितच कळाले पाहिजेत. ते गुरुजी म्हणजे बुजवडे (ता.राधानगरी) या गावचे श्रीपती कोंडी पाटील हे होत.आपल्या ८३ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या आठवणींना दैनिक महाभारतने दिलेला उजाळा.
गुरुजींचा जन्म १९३८ साली झाला.सातवी शिक्षणानंतर त्यांनी १९६२ साली सातारा जिल्ह्यात रहिमतपूर येथे डी. एड चे शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्र सांभाळत असतांना विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करतांना शिस्तीला फार मोठे महत्व असते.गुरुजी याच गुणांनी सर्वप्रिय होते.नेहरू शर्ट, विजार,डोक्याला टोपी,आणि भारदस्त मिशा,पायात कोल्हापूरी चपला,आणि गळ्याभोवती मफलर असा गुरुजींचा पेहराव.गुरुजींच्या काळात नोकरी करताना त्यावेळी वाहने नसल्याने विशेष करून पायी चालत यावे लागे तरी सुद्धा गुरुजी वेळेवर हजर. अनेक शाळांमध्ये त्यांनी आपल्या शिस्तीने आणि दराऱ्याने गावचे ताईत बनायचे आणि सर्वजण त्या पद्धतीने त्यांचा मानसन्मान आणि आदरही करायचे.
गरुजींनी १९५६ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश करत शिक्षण क्षेत्राची मनोभावे सेवा केली.त्यामध्ये वाडदे,सावर्डे वाकीघोल, कुडूत्री,डवरवाडी, कुरुकली,आणाजे,सोन्याची शिरोली आदी गावात शिक्षण देण्याची महत्वाची भूमिका बजावली.सोन्याची शिरोली येथे सेवा बजावत असताना १९९४ साली मुख्याध्यापक पद मिळाले तर १९९६ साली शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेत.आपला विद्यार्थी शिकला पाहिजे,घडला पाहिजे या तळमळीने शिक्षण दिले.
आपल्या आवाजात दरारा असला तरी विद्यार्थी वर्गाचा कधी रोष ओढावून घेतला नाही.त्यांचा स्वभाव हा फंणसासारखा असायचा म्हणजेच वरून कडक आणि आतून गोड.
आज गुरुजी आपल्या उतरत्या वयात कुटुंबात सुखाने दिवस घालवत आहेत.आजही भेटण्यासाठी त्यांना मोठा जनसमुदाय येत असतो.आजही त्यांच्या कुटुंबातील त्याना भक्कम साथ आहे.पत्नी, मुले व सुना तसेच नातेवाईक यांची साथ आहे. त्यांचे तीन चिरंजीव त्यामधील देवानंद यांचे अकाली निधन झाले.त्यानंतर दुसरे चिरंजीव आर.एस. पाटील सर हे गुरुजींच्या संस्कारांचा आदर्श जपत शिक्षण क्षेत्राची सेवा करतात तर तिसरे चिरंजीव संजय हे आरोग्य विभागात काम करत आहेत.
गुरुजीनी शिक्षण क्षेत्राची सेवा करत समाजाचा मान-सन्मान,प्रेम,मिळवलेच. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांना अनेक सन्मान मिळालेत.त्या मध्ये कुडूत्रीतील गुळवणी महाराज मंडळाचा निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार,तर पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, देखील त्यांच्या कार्याची साक्ष देतो.बुजवडे गावातील धार्मिक, सामाजिक,शैक्षणिक कामातील सहभाग मोठा असायचा आणि विशेष करून ते हार्मोनियम वादक म्हणून देखील नावारूपास आले.
आज गुरुजी जरी उतार वयात असले तरी त्यांच्या कुटुंबातील,नातेवाईकातील सर्वच मंडळी त्यांना चांगल्या पद्धतीने प्रेम,जिव्हाळा देत आहेत.असे गुरुजी निश्चितच आजच्या शिक्षकांना,विद्यार्थ्यांना, आणि समाजाला आदर्श घेण्यासारखे आहेत.आज त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत नाव कमवत आहेत.