काळम्मावाडी थेट पाईपलाईनच्या पाण्याचे राष्ट्रवादीकडून पूजन ;योजना कार्यान्वित झाल्याबद्दल कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचा आनंदोत्सव

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गेली ४०वर्षे कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा व्हावा यासाठी कोल्हापुरकरांनी अनेक आंदोलने, उपोषण केली आणि जनतेतून लढा उभारला गेला.अनेक अडचणींचा सामना करत काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना १० नोव्हेंबर २०२३ रोजी कार्यान्वित झाली.. याबद्दल कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेचे या योजनेसाठी प्रयत्न करणारे तत्कालीन माजी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुईखडी येथील पंपिंग स्टेशनवर आनंदोत्सव साजरा केला. कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ जमले. त्यानंतर शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली रॅलीने पुईखडी पंपिंग स्टेशनवर गेले.. त्या ठिकाणी त्यांनी काळम्मावाडी येथून आलेल्या पाण्याचे पुजन करून हे पाणी सजवलेल्या कलशांमध्ये घेऊन करवीरनिवासिनी आई अंबाबाईच्या चरणी तसेच छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि राजश्री शाहू जन्मस्थळावर राजश्री शाहूंच्या पुतळ्याला हे पाणी अर्पण केले.
कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफसाहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि अजितदादा पवार यांनी मंजूर केलेल्या ४५० कोटी रुपयांच्या निधीमुळे कोल्हापूर शहराला काळम्मावाडी येथून थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. गेली सहा ते सात वर्षे अनेक अडथळे येऊनसुद्धा ही योजना पूर्ण झाली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी यासाठी प्रचंड पाठपुरावा केला. कोल्हापूरकरांना काळम्मावाडीचे शुद्ध पिण्याचे पाणी आता उपलब्ध होणार आहे.. हे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि श्री हसन मुश्रीफसाहेब यांच्या नेतृत्वाचे यश असून यासाठी आपण आनंद उत्सव साजरा करत आहोत.
माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यानी मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे दिल्लीमध्ये पाठवला होता. सन २०१० ते २०१५ या पंचवार्षिकमध्ये कोल्हापूर महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची संयुक्त सत्ता होती. त्या काळात राज्याच्या कामगार मंत्री पदावर कार्यरत असलेल्या हसन मुश्रीफ यांनी यूआयडीएसएमटी योजनेअंतर्गत मंजुरीसाठी तत्कालीन स्थायी समितीचे सभापती असलेल्या माझ्यासह, जल अभियंता मनीष पवार यांच्यासमवेत केंद्रीय नगरविकास मंत्री श्री. कमलनाथ यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती व मंजुरीही मिळविली.
महेश सावंत म्हणाले, मंजुरीपासून पूर्णत्वापर्यंत योजनेच्या वाटचालीचा तब्बल दहा वर्षांचा प्रवास अत्यंत खडतर झाला. या कालखंडात थेट पाईपलाईनच्या वाटेत जंगल विभाग, रस्ते विभाग, जमीन संपादन यासोबतच ज्या गावातून ही पाईपलाईन येते त्या ग्रामस्थांना पाईपलाईनमुळे होणारा त्रास आणि यातून झालेला विरोध अशा अनंत अडचणी आल्या. बिद्री साखर कारखान्याच्या परिसरातून जाणारी विद्युतवाहिनी तसेच; कोरोना साथीचा काळ तर या योजनेसाठी दुष्टचक्र बनून राहिला. काळम्मावाडी धरण परिसर व संपूर्ण ५३ किलोमीटर पाईपलाईनचा भाग अतिपर्जन्यवृष्टीत येत असल्यामुळे पावसाळ्यात आणि त्यानंतर या योजनेचे काम ठप्प, हे गणित निश्चितच असायचे. या सगळ्या समस्यांवर मंत्री श्री. मुश्रीफ यांनी समन्वयांने कौशल्यपूर्वक मार्ग काढला. प्रसंगी विरोध असणाऱ्या विविध गावातील ग्रामस्थांशी त्यांनी व्यक्तिगत आणि सार्वजनिक पातळीवर चर्चा करून विरोधाचा विषय निकालात काढला.
असाही योगायोग……!
खरंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षांपूर्वी थेट पाईपलाईनच्या पाण्याने कोल्हापूरकर जनता दिवाळीचे अभ्यंगस्नान करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु; तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय बाबींमुळे ही बाब तब्बल दोन वर्षे पुढे आली. पालक मंत्रीपदी निवड होताच तीन आठवड्यापूर्वीच मंत्री श्री. मुश्रीफ यांनी थेट महापालिकेत जाऊन या योजनेविषयीची आढावा बैठक घेतली. काही झाले तरी या दिवाळीचे अभ्यंगस्नान कोल्हापूरकर थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच करतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, २०१० सालच्या कोल्हापुरातील सासने मैदानावरील महापालिकेच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “ही योजना मंजूर न झाल्यास पवारांची अवलाद सांगणार नाही,” असे टोकाचे वक्तव्य केले होते. त्यानंतर मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही सातत्याने या योजनेचा पाठपुरावा केला. आज मंत्री श्री. मुश्रीफ पालकमंत्री पदी असताना ही योजना पूर्ण होत आहे. या योगायोगाची शहरवासीयांमध्ये चर्चा आहे.
याप्रसंगी माजी उपमहापौर प्रकाश पाटील, सुनील पाटील, संदीप कवाळे, प्रकाश गवंडी, रमेश पोवार, विनायक फाळके, उत्तम कोराने, रेखा आवळे, यशोदा मोहिते, शारदा देवणे, वंदना आयरेकर, महेश सावंत, परीक्षित पन्हाळकर, आनंदराव खेडकर, शमा मुल्ला, सचिन पाटील, जाहिदा मुजावर, युवराज साळोखे, रामेश्वर पतकी, प्रमोद पवार , महेंद्र चव्हाण, विजयेंद्र चव्हाण, सुहास साळुंखे, सुरेश कुराडे, बेनझीर नदाफ, शितल तिवडे, सुमन वाडेकर, स्वाती काळे, पूनम सुळगावकर, राणी गायकवाड, भक्ती हेगडे, गब्बर मुल्ला, संजय पडवळे, करुणा होवाळे, लहुजी शिंदे , विघ्नेश आरते, सचिन लोहार, विकी भास्कर, रमेश बिरांजे , अनिल व्हरकट, आकांक्षा चौधरी, प्रिया गोंधळे, हेमा गुदगे, रूपाली पाटोळे, शोभना खामकर, छाया संकपाळ यांच्यासह कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.