पंकजा मुंडे यांना बीआरएसची ऑफर ; थेट मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनविण्याची तयारी

महाराष्ट्रात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. तेलंगणात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष आता महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील अनेक नेते बीआरएसमध्ये दाखल होत आहेत. पण बीआरएसने एक मोठी खेळी खेळली आहे. या पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहराही तयार केला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी थेट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आॅफर दिली. आपल्याला भाजपमध्ये अनेकदा डावलण्यात आल्याची भावना पंकजा मुंडे यांच्यामध्ये आहे.
तशी जाहीर नाराजी त्यांनी गोपीनाथ गडावर आपल्या भाषणात बोलून दाखविली होती. यासाठी आपण अमित शहांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या या कथित नाराजीचाच फायदा बीआरएस करुन घेताना दिसतो आहे.
पंकजा मुंडेंच्या आॅफरबाबत सांगताना बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण देशभरात भाजप रुजवण्याचे काम केले. पण त्यांच्या मुलीवरच आज भाजपत अन्याय होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना बीआरएसमध्ये घेण्यासाठी आम्ही अध्यक्ष केसीआर यांच्याशी चर्चा करु. केसीआर त्यांना नक्कीच मुख्यंमत्रीपदाचा चेहरा बनवतील, असे सांगितले.