आम आदमी रिक्षाचालक संघटनेने आर्थिक मदत करत जपली बांधिलकी; रिक्षाचालकाचे कोरोनाने निधन, पाठोपाठ मुलगाही गेला.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला मुकावे लागले. कंदलगाव येथे राहणारे बळवंत लोखंडे हे रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकत. परंतु कोरोनाने त्यांना गाठले आणि गेल्या महिन्यात त्यांचे निधन झाले. पाठोपाठ त्यांच्या मुलाचे देखील निधन झाल्याने लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लोखंडे आम आदमी पार्टीच्या आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे सदस्य होते. त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात मन पिटाळून लावणारा होता.
याची दखल घेत आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने लोखंडे कुटुंबाला पंधरा हजार नऊशे एक्कावन रुपये रोख आणि रेशन किट देण्यात आले. ही मदत आम आदमी पार्टीचे सभासद तसेच लोखंडे यांच्यासोबत रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांनी एकत्र येऊन केली. रिक्षा चालक उमेश मनगुते यांनी तर स्वत:ला आलेले शासनाचे 1500 रुपयाचे अनुदान मदत म्हणून दिले. मदतीची रक्कम आणि रेशन किट लोखंडे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कंदलगाव येथील निवासस्थानी जाऊन सुपूर्द करण्यात आली. आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या प्रत्येक सदस्यांच्या सुख-दुःखात आम्ही मदतीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न करत राहू, असे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राकेश गायकवाड, प्रकाश हरणे, बाबुराव बाजारी, विजय भोसले, महेश घोलपे, विशाल वठारे, सुरज सुर्वे, मोईन मोकाशी, अमरजा पाटिल, पल्लवी पाटिल, बसवराज हदीमणी, विजय हेगडे आदी उपस्थित होते.