कागल तालुक्यातील ८६ गावांतील पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील ८६ गावांत अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित ४२७४ हेक्टर (१०,६८५ एकर) क्षेत्रातील शेत पिके व फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ऊस २६६० हेक्टर, तर सर्वात कमी फळ पिकांचे (१ हेक्टर) नुकसान झाले आहे. आजअखेर ५४ टक्के क्षेत्रातील पंचनामे झाले असून पावसाचा अडथळा न आल्यास पंचनामे लवकर पूर्ण होतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी दिली.
तालुक्यातील ८६ गावांतील पिकांना अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसला आहे. सुमारे ४,२७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस २६६० हेक्टर (६६५० एकर), भात ५१८ हेक्टर (१२९५ एकर), सोयाबीन ७३९ हेक्टर (१८४७ एकर), भुईमूग १८० हेक्टर (४५० एकर), भाजीपाला ६०.५० हेक्टर (१५१ एकर), इतर पिके ३० हेक्टर (७५ एकर), फळ पिके १ हेक्टर ( अडीच एकर) क्षेत्रातील शेत व फळ पिकांचे नुकसान झाले आहे. तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांनी अतिवृष्टी पिकांच्या नुकसानीचे
पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
कागल तालुक्यात जुलै महिन्यात सलग तीन दिवस दोनशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे दूधगंगा, वेदगंगा आणि चिकोत्रा या नद्यांना महापूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या ऊस पिकासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. ८६ गावांतील ४, २७४ हेक्टर क्षेत्रातील पिके महापूर व अतिवृष्टीने बाधित झाली होती. तसेच अतिवृष्टीमुळेही नदीकाठ वगळता इतर क्षेत्रातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
शासनाच्या महसूल व कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. पंचनामे करण्यासाठी २२ पथके करण्यात आली आहेत. या पथकात एक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि गावातील सेवा सोसायटीच्या सचिवाची नेमणूक करण्यात आली आहे. पंचनामे करण्याचे काम आजअखेर ५४ टक्के झाले असून पावसाचा अडथळा न आल्यास लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी सांगितले.