जंगलाबाहेर येणाऱ्या गव्यांना होवू शकतो लम्पीचा संसर्ग ; पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास रोग फैलावाची भिती ; संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज

बिद्री प्रतिनिधी :
सध्या जनावरांमध्ये आणि विशेषतः बैलकुळातील जनावरांमध्ये म्हणजे गायी, बैल या प्राण्यांमध्ये लम्पि आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत आहे. शासन स्तरावर, वैयक्तिक शेतकरी आपले पशुधन वाचवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करत आहेत. परंतु या रोगाचा फैलाव जोरात झाला तर याचा धोका मानवी वस्तीत किंवा गायरानात येणाऱ्या गव्यांना देखील पोहचू शकतो. त्यामुळे गव्यांना या आजाराचा धोका पोहचू नये यासाठी संभाव्य धोका ओळखून अगोदरच उपाय योजना आखली जावी अशी मागणी प्राणी व पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.
पश्चिम घाटातील जंगलाची शान असलेला गवा हा पण बैलकुळातीलच प्राणी आहे. सध्या गवे मानवी वस्ती पर्यंत पोहचले आहेत त्यामुळे स्थानिक गायरानात हेच गवे पाळीव म्हशी,गायी च्या बाजूला पण चरताना अनेक वेळा आढळले आहेत. अशा प्राण्यांमार्फत येणाऱ्या काळात हा लम्पी गव्या पर्यंत पोहचला तर आश्चर्य वाटायला नको. त्यासाठी आता शासन,वन विभाग व प्राणी प्रेमी यांनी लक्ष देऊन काहीतरी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
पर्यावरण व अन्नसाखळीत प्रत्येक प्राण्याचे अन्यनसाधारण महत्त्व आहे. आपल्या जिल्ह्यात गवा प्राण्याचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे. गवे जंगलात न राहता आता मानवी वस्ती, शेत शिवार, गायरानात येवू लागले आहेत. असे गवे जर चुकून गावातील किंवा रानातील लम्पी रोगाची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आले तर त्या माध्यमातून जंगलातील गव्याला होवू शकते. आणि असे झाल्यास त्याचा फैलाव जंगलातील गव्यामध्ये पसरणार आहे. शिवाय उपचार करणे देखील अवघड होणार आहे. याचे गांभीर्य ओळखून वेळीच उपाययोजना आखल्या पाहिजेत.
गव्याची काळजी आवश्यक ……….
पश्चिम घाटातील जैव विविधतेत गवा हा जास्त संख्येने आढळणारा प्राणी आहे. अलिकडे हा प्राणी जंगल सोडून जंगलाबाहेर फिरताना दिसतो. सध्या लम्पी या आजाराचा फैलाव जोरात सुरु असल्याने गवा प्राण्यांची या बाबत काळजी आवश्यक आहे. देशातून चिता नामशेष झाल्याने चित्ता आपण परत आफ्रिकेतून आणून त्याचे संवर्धन करत आहोत पण आपला गवा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्याची काळजी घेणे पण गरजेचेच आहे. लम्पी आजाराचा धोका त्यांना पोहचू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे
सम्राट केरकर
अध्यक्ष- बायसन नेचर क्लब राधानगरी