सहकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कणा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; बिद्रीत विविध सहकारी संस्थांचा उदघाटन सोहळा उत्साहात

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
विविध सहकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. राज्याला सहकारी चळवळीचा मोठा वारसा लाभला असून सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी या संस्था आधारभूत ठरल्या आहेत. संस्थेचे सभासद हे मालक तर संचालक हे विश्वस्त मानून काम केले तर संस्था प्रगतीपथावर जाते. अशा संस्थांनी पारदर्शकपणे कारभार करून सभासदांच्या हिताचे कार्यक्रम राबवावेत, अशी अपेक्षा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
बिद्री ( ता. कागल ) येथील संत बाळूमामा सेवा संस्था, नामदार हसनसो मुश्रीफ दूध संस्था, संत बाळूमामा मका प्रक्रिया संस्था, संत बाळूमामा कडधान्य प्रक्रिया संस्था, संत बाळूमामा भाजीपाला प्रक्रिया संस्था या नव्याने सुरु झालेल्या सहकारी संस्थांचे उदघाटन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याच्या सहकाराची शिखर संस्था आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील आहे. केडीसीसी बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीना स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी ताराराणी अर्थसाह्य योजना सुरू आहे. याचा माता- भगिनींनी लाभ घ्यावा.
यावेळी सलग सहावेळा आमदारपदी आणि नवव्यांदा कॅबिनेटनंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा माजी सरपंच शिवाजी दौलू पाटील आणि माजी उपसरपंच राजाराम ज्ञानू चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, बिद्रीचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, माजी सभापती जयदीप पोवार, माजी उपसभापती भूषण पाटील, विकास पाटील, शशिकांत खोत, सुनिलराज सूर्यवंशी, देवानंद पाटील, पांडूरंगतात्या पाटील, सरपंच पूजा पाटील, उपसरपंच सागर कांबळे, माजी सरपंच पांडूरंग चौगले, आण्णासो पोवार, राजेंद्र चौगले, माजी उपसरपंच पांडुरंग कळमकर, विशाल चौगले, अमोल चौगले, संदेश चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत एम. एम. चौगले यांनी केले. प्रास्ताविक चंद्रकांत पाटील यांनी केले. आभार विश्वनाथ डफळे यांनी मानले.