ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“सीए’ परीक्षेत दोन सांगलीकरांचा झेंडा

सांगली प्रतिनिधी :

देशात अतिशय कमी निकाल लागणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत दोघा सांगलीकरांनी लख्ख यश मिळवले आहे. तासगाव तालुक्‍यातील मतकुणकी येथील शेतकरी कुटुबांतील दिगंबर विश्‍वास पाटील यांनी चारशेपैकी 217 गुण मिळवले आहेत; तर येथील खणभागातील फौजदार गल्लीतील प्राजक्ता लंगडे-सिदनाळे हिने 211 गुण मिळवले.

सीए, सीएस या परीक्षेत यापूर्वी पुण्या-मुंबईतील मुलांची मक्तेदारी असायची; मात्र गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील मुलांचाही या परीक्षांकडे ओढा वाढला आहे. त्याचे परिणामही दिसून येत असून आज जाहीर झालेल्या सीए परीक्षेत सांगलीच्या दोघा तरुणांनी यश मिळवल्याचे सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले.

त्यामध्ये मतकुणकीच्या दिगंबर पाटील यांचे यश ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्‍वास वाढवणारे आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या दिगंबर यांचे माध्यमिक शिक्षण तासगावच्या चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी तासगावच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयात, नंतर पदवीसाठी सांगलीतील गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तिथूनच त्यांनी सीएची तयारी सुरू केली. दररोज बारा तास अखंड अभ्यास सुरू ठेवला. मात्र, यश त्यांना सतत हुलकावणी देत होते. यंदा मात्र त्यांनी हे यश खेचून आणले.

चारशे गुणांच्या या परीक्षेत 217 गुण मिळवले. प्रा. चंद्रकांत कडोले, भाऊ प्रा. वैभव पाटील यांचे आपल्या यशात योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील खणभागातील प्राजक्ता लंगडे यांनी या परीक्षेत यश मिळवले. त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक. त्यांनी मात्र स्वतःची वेगळी वाट निवडली. त्यांनी पुरोहित कन्या प्रशालेत प्राथमिक व माध्यमिक; तर महाविद्यालयीन शिक्षण आरवाडे महाविद्यालयात पूर्ण केले.

पदवीनंतर सीए परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या ग्रुपमध्येच त्यांनी हे यश मिळवले. प्राजक्ता यांचा कोल्हापूरमधील खासगी व्यावसायिक शीतल सिदनाळे यांच्याशी विवाह झाला आहे. सासरी देखील शिक्षणाची पार्श्‍वभूमी असून, सासरे आणि सासू दोघेही मुख्याध्यापक आहेत. त्यांनी सूनेच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. नातीचाही सांभाळ केला. चार वर्षांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले, असे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks