भाऊक वातावरणात कापशी कोविड केअर सेंटरची सांगता सत्काराने भारावले डॉक्टर

सेनापती कापशी :
शशिकांत खोत यांच्या पुढाकाराने अडीच महिन्यांपासून कापशी येथे सुरू असणारे माझा भाग माझी जबाबदारी कापशी कोविड केअर सेंटरची सांगता अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी अडीच महिन्यांपासून सेंटरवर सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स, परिचारिका,वार्ड बॉय, स्वयंवसेवक यांचा सत्कार गडहिंग्लज येथील हृदयरोग तज्ञ डॉक्टर सी. आर. देसाई व माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
कापशी कोविड केअर सेंटर जिल्ह्यातील एक आदर्श सेंटर असून इथे वेगवेगळे उपक्रम राबवून रुग्णांना या आजारातून बरे होण्यासाठी नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. रुग्ण व या सेंटर मधील लोकांमध्ये एक भावनिक नाते निर्माण व्हायचे त्यामुळे रुग्णांना देखील घरी जाण्याच्या ओढीपेक्षा इथे राहण्यातच जास्त आनंद वाटायचा यातच या सेंटरचे यश दिसून येते असे मत डॉक्टर सी. आर. देसाई यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना शशिकांत खोत यांनी सांगितले की, अडीच महिन्यात कापशी कोविड सेंटरमध्ये 405 रुग्णांवर उपचार केले असून आजपर्यंत एकाही मृत्यूची नोंद इथे झालेली नाही हे यश फक्त माझे एकट्याचे नसून इथे सेवा देणाऱ्या सर्व वैद्यकीय स्टाफ, स्वयंसेवक व माझ्यावर विश्वास ठेवून भरभरून सहकार्य करणाऱ्या सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळामुळेच हे शक्य होऊ शकले. आज पर्यंत केलेल्या सर्व सामाजिक कामांपेक्षा या रुग्ण सेवेतून मिळालेले समाधान हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पुण्याई असल्याचे मत शशिकांत खोत यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. धामणकर, डॉ.साठे, रोहिणी भोई,उज्वला कांबळे, स्टेला मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत प्रविण नाईकवाडे व प्रास्ताविक सुनील चौगुले , सूत्रसंचालन विशाल कुंभार व आभार अवधूत आठवले यांनी मानले.