जांभुळखोऱ्यातील कॅनॉल (चर ) फुटून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील मुरगूड नगरपालिका हद्दीतील जांभूळ खोरा परीसरातील कॅनॉल (चर) फुटून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व सदर चरीची तातडीने दुरुस्त करून घ्यावी . यासंदर्भाचे निवेदन जांभूळ खोरा नागरीकांचे वतिने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .
यावेळी प्रमुख उपस्थिती मा. विरेंद्र मंडलिक होते . त्यांचे सोबत माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले , दत्तात्रय मंडलिक , विक्रम गोधडे, समीर गोरूले , तानाजी गोरूले , परशुराम रामाणे , भैरू इंदलकर, अनंत इंदलकर , विष्णु गोरूले, पिंटू भारमल व शेतकरी बांधव उपस्थित होते .
स्वातंत्रपूर्व काळात राजर्षि छ. शाहुमहाराजांनी बांधलेल्या सर पिराजीराव तलावास पाणी पुरवठा करणेसाठी दक्षिण दिशेकडील डोंगर उतारावरून येणारे पाणी वाहून नेणेसाठी जांभुळ खोरा परिसराच्या दक्षिणे कडील डोंगर पायथ्यावरून कॅनॉल ची निर्मीती केली होती . सध्या तलावाची मालकी ही सर पिराजीराव ट्रस्ट यांचे कडे असून त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही सर पिराजीराव तलाव प्रशासनाची आहे. मात्र गेली १० वर्षे या चरीची देखभाल व दुरुस्ती न पाहिल्याने सदर चरीमधे गवत झुडपे झाडे यांची वाढ झाली आहे तसेच गाळ व वाळू साठून राहिली आहे . त्यामुळे दि . २४ व २५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने या चरीत पाण्याचा मोठा लोंढा आल्याने सदर चर पाच ठिकाणी फुटली होती . त्यावेळी शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते .
लोकवस्तीतून पाणी शिरले होते . परीसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झाले होते . त्यानंतर तलाव प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने , चरीची दुरुस्ती न केल्याने दि ५ /१० /२०२१ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने ही चर पुन्हा दोन ठिकाणी फुटली . आणि हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पुन्हा प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांना जिल्हाधिकारी यांचेकडे धाव घ्यावी लागली आहे.