ओमायक्रॉन विषाणूबाबत नागरिकांनी दक्ष राहावे : समरजितसिंह घाटगे ; प्रशासनाने ही आपली यंत्रणा सज्ज ठेवावी

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग केंव्हा झपाट्याने वाढेल हे सांगता येत नाही.पण त्याबाबत भीती बाळगण्याचे ही कारण नाही. तरीही आजची परिस्थिती पाहता त्याबाबत योग्य ती काळजी घेत नागरिकांनी त्याबाबत दक्ष राहावे असे आवाहन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग जागतिक महामारी कोरोनाशी दोन हात करीत आहे.सर्वांनी घेतलेल्या आवश्यक त्या काळजी व खबरदारीमुळे तिसरी लाट रोखण्यामध्ये यश आले आहे. मात्र ओमायक्रॉन या विषाणूचे परदेशात बाधित आढळणारे रुग्ण भारतामध्ये काही ठिकाणी आढळत आहेत. आज त्यांची संख्या कमी असली तरी ती वाढण्याची भीती आहे. त्यासाठी नागरिकांनी आवश्यक त्याबाबतची आवश्यक ती खबरदारी व काळजी घ्यावी. घाबरून जाऊ नये .सामाजिक अंतर राखावे. मास्क सॅनिटायझरचा वापर करावा. 18 वर्षावरील काही नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही.अशा नागरिकांमध्ये या विषाणूच्या संक्रमणाचा धोका अधिक आहे.त्यामुळे जवळच्या केंद्रावर लसीकरण करून घ्यावे. असे आवाहनही त्यांनी केले.तसेच पूर्व काळजी म्हणून आरोग्य विभागामार्फतही आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना राबवाव्यात. त्यासाठी आरोग्य यंत्रणा ही सज्ज ठेवावी असेही पत्रकात म्हंटले आहे.