ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना ‘अशा’ शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर गेल्या तीन चार दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केलं आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुुरंदरे यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोकाकुल वातावरण झालं आहे.
शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. तर बाबासाहेब पुरंदरेच्या निधनाच्या वृत्तानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधुन सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच बाबासाहेब पुरंदरे यांनी 100व्या वर्षात पदार्पण केलं होतं.
शिवचरित्रकार आणि जेष्ठ इतिहासकार अशी ओळख असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर सगळ्याच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.