#Maharashtra_Lockdown : राज्य सरकारचं ठरलंय! महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा.

मुंबई :
लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील. वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यान दिला होता. परंतु, कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील अत्यंत वरिष्ठ आणि विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं समजतं.
राज्यातील आकडेवारी चिंताजनक
महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल ४७ हजार ८२७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर २४ हजार १२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.
मुंबईत तर कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद शुक्रवारी झाली आहे. एका दिवसात तब्बल ८८३२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता ५८ हजार ४५५ वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे.