केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यात महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा : जिल्हाधिकारी रेखावर यांच्याकडून पथकासमोर महापुराने झालेल्या नुकसानीच्या माहितीचे सादरीकरण

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महापूर आलेला होता. या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती केंद्रीय अंतर मंत्रालय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. हे केंद्रीय पथक वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनिष कुमार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने झालेल्या नुकसानीची माहिती पथकासमोर सादर केली. कोल्हापूर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1772 मिलिमीटर इतके असून यावर्षी आज पर्यंत 1064 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. दिनांक 22 ते 25 जुलै या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने महापुर आला. या महापुरामुळे जिल्ह्यातील 409 गावे व त्यातील 72 हजार 411 कुटुंबे बाधित झालेली आहेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी, भुदरगड व गडहिंग्लज या तालुक्यातील रस्त्यांचे अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूस्खलन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली. जिल्ह्यात या कालावधीत राधानगरी 2, चंदगड 2, कागल 1 व भुदरगड 1 असे 6 मृत्यू झालेले असून प्रत्येकी चार लाख याप्रमाणे 24 लाख रुपये तसेच दुधाळ जनावरे 81, लहान जनावरे 37 व 1874 पोल्ट्री बर्डस यासाठी 30 लाख 56 हजाराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरामुळे बाधित झालेल्या 409 गावातील घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून यासाठी किमान 18 कोटी 72 लाख रुपयांची आवश्यकता असून हँडीक्राफ्ट, हॅण्डलूम यांच्यासाठी एक कोटी तीस लाखाची आवश्यकता आहे. त्याप्रमाणेच छोटे दुकानदार व व्यवसायिक यांच्यासाठी 53 कोटी 95 लाखांची आवश्यकता असून मत्स्य व्यावसायिकांचेही नुकसान झाले असून त्यासाठी 6 कोटी 44 लाखाची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली.
अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी जवळपास 94 कोटी 52 लाख तसेच कृषी योग्य जमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी 4 कोटी 13 लाखांची आवश्यकता असून पुरामुळे विविध विभागाच्या मालमत्तेचे झालेले नुकसान एकूण 226 कोटी 48 लाख इतके आहे. यामध्ये आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत बांधकाम, वीजवितरण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग व कृषी विभाग यांच्या नुकसानीचा समावेश होतो, अशी माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली. तसेच महापुरामध्ये जिल्हा प्रशासनाने व येथील स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या बचाव व मदत कार्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त श्रीमती बलकवडे यांनी महापालिका क्षेत्रात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
या केंद्रीय पाहणी पथकाचे प्रमुख रेवनीष कुमार, यांनी एनडीआरएफच्या निकषानुसार मदत मिळेल असे सांगितले. यावेळी नागपूर येथील जलशक्तीचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक श्रीमती पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, प्रताप जाधव हे पथकातील अन्य सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्यासह वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
खासदार माने यांनी घेतली केंद्रीय पथकाची भेट
खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय पथकाची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती केंद्रीय पथकाला दिली. एन डी आर एफ नुसार मिळणारी मदत ही खूप कमी असून ही मदत झालेल्या नुकसानीप्रमाणे मिळावी, यासाठी निकषामध्ये बदल करण्याची शिफारस केंद्रीय पथकाने करावी तसेच मदतीसाठी व पुनर्वसनासाठी एक राष्ट्रीय धोरण असावे, अशी मागणी त्यांनी केली.