कागलमध्ये पत्नीसह दोन मुलांचा निर्घृण खून

कागल प्रतिनिधी :
किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीसह पोटच्या दोन मुलांचा निर्घृृण खून करून नराधम पती मी बायको आणि दोन पोरांना संपवलेय… मला आत घ्या असे म्हणत निर्विकार चेहर्याने पोलिसात हजर झाला. कागल येथील बेघर वसाहतीत घडलेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. गायत्री प्रकाश माळी (वय 30), कृष्णा (10) आणि आदिती (16) अशी मृतांची नावे असून प्रकाश बाळासो माळी (वय 36) असे संशयीताचे नाव आहे.
एका साखर कारखान्यात नोकरी करणारा प्रकाश कोष्टी गल्लीतून गणेश नगर येथे राहयला आला. मंगळवारी दुपारी पत्नी गायत्रीशी त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातूनच प्रकाशने गायत्रीचा गळा आवळून खून केला व तिचा मृतदेह आतील खोलीत लपवून ठेवला. पाच वाजता मुलगा कृष्णा शाळेतून घरी आला तेव्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत बसला होता. कृष्णा आतील खोलीत गेल्यावर त्याला आई जमिनीवर पडलेली दिसली. त्याने आईला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती जागची हलत नव्हती. आईसोबत आपल्या वडिलांनी काहीतरी केले आहे, हे लक्षात आल्यावर कृष्णा जोरजोरात रडू लागला. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने कृष्णाचाही गळा आवळून खून केला.
कृष्णाचा मृतदेह त्याने त्याच खोलीत ठेवला आणि पुन्हा बाहेरच्या खोलीत येवून जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात बसला. साडेसातच्या सुमारास आदिती घरी परतली. आतील खोलीत आई आणि भावाचा मृतदेह बघून तिने हंबरडा फोडला. प्रकाशने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला पण आदिती ओरडू लागली. त्यामुळे प्रकाशने तिलाही गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. पण ती हिसडा मारून निसटली. त्यामुळे प्रकाशने स्वयंपाकघरातील वरवंटा तिच्या डोक्यात घातला. आदिती रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्यावर पुन्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत येवून बसला.
रात्री 9च्या सुमारास प्रकाश घरातून बाहेर पडला आणि कोष्टी गल्लीतील आपल्या भावाकडे गेला. मी बायको आणि दोन मुलांना मारून आलोय, असे त्याने भावाला सांगितले. पण भावाला तो मस्करी करतोय असे वाटल्याने त्याने त्याला हाकलून लावले. तेथून प्रकाश कागल पोलिस ठाण्यात आला.
कागल पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी होती. त्यामुळे पोलिसांनी बाहेरचे गेट बंद केले होते. प्रकाश या गेटवर गेला आणि दरवाजा उघडा, असे पोलिसांना सांगू लागला. पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी असल्याने वातावरण तंग होते. त्यामुळे पोलिसांनी प्रकाशला हटकले. दार उघडा आणि मला आत घ्या… मी बायको आणि दोन पोरांना संपवलंय… असे त्याने पोलिसांना सांगितले. तरीही पोलिसांचा त्यावर विश्वास बसला नाही. अखेर पोलिसांनी त्याला आत घेतले आणि त्याच्याकडून अधिक माहिती मिळवली. घटनास्थळाचे दृष्य पाहून पोलिसह हादरले. एकाच खोलीत तिघांचे मृतदेह पडले होते.