कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे ; विधानभवन परिसरात भरपावसात आमदार रोहित पवारांचे आंदोलन

कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे, तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी भर पावसात विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले.
रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित आहे. या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून या संदर्भातील बाबी पूर्ण करण्याकरिता रोहित पवार यांनी उद्योगमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
उद्योगमंत्र्यांनी त्यांना यासंदर्भात लवकरात लवकर अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिलं आहे. आता शासन स्तरावर कारवाई होत नसल्याने रोहित पवार यांनी आज भर पावसात विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत सरकारचे लक्ष्य वेधले. एमआयडीसंदर्भातील अधिसूचना तातडीने जाहीर व्हावी अशी त्यांची मागणी आहे.