शेतकर्याने जागवल्या लाडक्या ‘ शामा ‘ बैलाच्या आठवणी ; घरगुती आरासीत साकारला बैलजोडीचा देखावा

बिद्री ( प्रतिनिधी ) :
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी शेतात राबून ज्याने आपला संसार उभा केला त्या लाडक्या ‘ शामा ‘ बैलाची आरास करुन शेतकर्याने त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बैलजोडी आणि बैलगाडीचा हुबेहुब प्रतिकृती ; गाडीत बसलेली गणपतीची मुर्ती, त्यासोबत गाडीला बांधलेला पारंपारिक कंदील, बैलांना पाणी पाजण्यासाठी पाण्याची बादली आणि गाडीसोबत चालणारा कुत्रा असा ग्रामीण संस्कृतीचा दर्शन घडवणारा हा देखावा सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहे.
बोरवडे ( ता. कागल ) येथील बाळासो धोंडीराम सुर्यवंशी या शेतकर्याने घरच्या गणपतीसाठी हा देखावा साकारला आहे. त्यांच्या तरुणपणी गोठ्यात घरच्या गाईचा एक खोंड होता. लाडाने त्याला सर्वजण ‘ शामा ‘ नावाने हाक मारायचे. या शामाने पुढे काबाडकष्ट करुन मालकाचा संसार फुलवला. या बैलामुळेच आपल्याला चांगले दिवस आल्याची कृतज्ञता सुर्यवंशी यांच्या मनात कायम आहे.
परंतु १९७२ च्या दुष्काळावेळी या बैलाचा दुर्देवी मृत्यू झाला. तेंव्हापासून बाळासो सुर्यवंशी यांना या बैलाच्या उपकाराची परतफेड म्हणून त्याची प्रतिकृती बनविण्याची इच्छा होती. यावर्षी घरच्या गणपतीची आरास करताना त्यांनी ही इच्छा आपल्या मुलांना सांगितली. त्यांच्या सुधीर व समीर या मुलांनी त्याप्रमाणे आरास करुन ‘ शामा ‘ ला वेगळ्या प्रकारे आदरांजली वाहिली .
बाळासो यांचे वडील धोंडीराम सुर्यवंशी यांनी प्रतिकुल परिस्थितीतही ‘ शामा ‘ ला खाऊपिऊ घालून धष्टपुष्ट बनवले होते. त्यामुळे शामा अंगाने मजबूत बनला होता. १९७० च्या दरम्यान वेदगंगा नदीला आलेल्या पुरात निढोरीच्या पुलावर एसटी बस पाण्यात अडकली होती. त्याकाळी अन्य पर्यायी व्यवस्था नसल्याने अधिकारीही हतबल झाले होते. अशावेळी पाहुण्यांकडे बैलगाडीतून आलेल्या धोंडीराम यांनी शामासोबत अन्य बैल जोडून ही एसटी पाण्यातून ओढून बाहेर काढल्याची आठवण त्यांच्या कुटूंबियांनी सांगितली.